काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याकडे नकोच; प्रियांका गांधींची भूमिका - priyanka gandhi said non gandhi person should be chief of congress party | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याकडे नकोच; प्रियांका गांधींची भूमिका

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड होऊन एक वर्षाचा काळ लोटला आहे. पक्षात आता पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे राहणार की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. यावर नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहतील, असे पक्षाने स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्षाचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. 

काँग्रेसचे नेते शशि थरुर यांनी पक्षाने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका घेतली होती. यावरुन काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाने तातडीने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांचीच पद स्वीकारण्याची इच्छा नसेल तर पक्षाने दुसरा पर्याय शोधालयला हवा. पक्षाला पुढील वाटचाल करण्यास पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे. 

सोनिया गांधी यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपला आहे. त्यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुदत संपली असली तरी अध्यक्षपद आपोआप रिकामे होणार नाही. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहतील. ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मात्र, ती तातडीने पूर्ण होईल, अशी शक्यता नाही, असे पक्षाने याआधी स्पष्ट केले होते. 

काँग्रेस कार्यकारी समितीच्या माध्यमातून नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबवली जाईल. आगामी काळात लवकरच ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न असून, त्याचा निकाल सर्वांसमोर मांडण्यात येईल. याबाबतची प्रक्रिया काँग्रेसच्या घटनेत लिहिलेली आहे. पक्षाने तिचे पालन करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल, असे पक्षाने म्हटले होते. 

भारतातील नवीन पिढीतील नेत्यांवर एक पुस्तक प्रकाशित झाले असून, यातील मुलाखतीत प्रियांका गांधी यांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष असावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षाचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असावा. राहुल गांधी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचेही हेच म्हणणे आहे की, गांधी कुटुंबातील व्यक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी नको. मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. पक्षाने आता वेगळा मार्ग शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

भाजपने नवीन माध्यमांचा वापर काँग्रेसला नामोहरम केले. आम्हाला हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष झाला तर त्यांचे आदेश आम्ही दोघे बहीण-भाऊ ऐकू. त्यांनी माझ्यावर उत्तर प्रदेशची अथवा अंदमान व निकोबारची जबाबदारी टाकली तरी मी स्वीकारेन, असे प्रियांका गांधींनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख