पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांना राज्यात फिरु देणार नाही.. - Prithviraj Chavan and Mukul Wasnik will not be allowed to roam in the state. | Politics Marathi News - Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांना राज्यात फिरु देणार नाही..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांना राज्यात फिरु देणार नाहीत.

मुंबई : काँग्रेस कार्यकारी समिती आज (ता.२४) बैठक होत आहे. आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. काही खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली केल्यानं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघडकीस आली आहे.  राज्याचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी याबाबत टिका केली आहे. याबाबत केदार यांनी टि्वट केलं आहे. 

याबाबत सुनील केदार यांनी म्हटले आहे की काँग्रेस नेते मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरु देणार नाहीत. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडं असणं गरजेचं आहे. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. 

पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी संघटनात्मक रचनेत बदल  करण्यासोबत नव्या नेतृत्वाचा आग्रह धरला आहे. आम्ही सोनिया अथवा राहुल यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही, केवळ बदलांचा आग्रह धरला असल्याचेही त्या नेत्याने सांगितले. हे पत्र या सर्व नेत्यांनी 7 ऑगस्टला सोनियांना लिहिल्याचे कळते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यावर पक्षांतर्गत विचारमंथन झाले नाही. पक्षाचे नेतृत्वही जबाबदारी घेताना दिसत नाही, अशी खंतही पत्रात व्यक्त केली आहे 

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या निकटवर्ती नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपवावी, अशी मागणी केली आहे. या गटाने पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे म्हणून आग्रह धरला आहे, विद्यमान खासदार मणिक्कम टागोर यांनी पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे. टागोर यांच्याप्रमाणेच छल्ला वामशी रेड्डी, तेलंगणमधील काही माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांनी राहुल यांनाच अध्यक्ष केले जावे अशी मागणी केली आहे.

नेतृत्वबदलासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, पृथ्वीराज चव्हाण, राजिंदरकौर भट्टल, माजी मंत्री मुकूल वासनिक, कपिल सिब्बल, एम. वीरप्पा मोईली, शशी थरूर, मनिष तिवारी तसेच, माजी खासदार मिलिंद देवरा, जितीन प्रसाद आणि संदीप दिक्षित यांचा समावेश आहे. याशिवाय राज बब्बर, अरविंदसिंग लव्हली, कौलसिंह ठाकूर, अखिलेशप्रसाद सिंह आणि कुलदीप शर्मा या प्रदेशाध्यक्षांनीही बदलांची मागणी केली आहे. 
 Edited  by : Mangesh Mahale      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख