पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे! - prime minister narendra modis foreign travels cost government 517 crore | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

देशाची धुरा हाती घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौऱ्यांवर भर राहिला आहे. मोदींनी मार्च 2015 पासून नोव्हेंबर 2019 पर्यंत तब्बल 58 देशांचे दौरे केले आहेत, अशी महिती सरकारनेच दिली आहे.  

नवी दिल्ली : केंद्रात भाजप सत्तेत आले अन् नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. तेव्हापासून मोदींनी विदेश दौऱ्यांचा धडाका लावला होता. मोदींनी  2015 पासून  2019  पर्यंत 58 देशांचे दौरे केले आहेत. या दौऱ्यासाठी सरकारने तब्बल  517.82 कोटी रूपयांचा खर्च केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत आज ही माहिती दिली. मोदी यांनी निवडून आल्यावर पहिल्या वर्षी 2014 मध्ये केलेल्या अमेरिका व जपानसह सुमारे 10 देशांच्या दौऱ्यांचा यात समावेश नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, मार्च 2015 ते नोव्हेंबर 2019  या काळात पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर 517.82 कोटी रूपयांचा खर्च झाला. मोदींच्या या दौऱ्यांमुळे द्विपक्षीय, उपखंडीय व जागतिक मुद्यांवरील भारताच्या दृष्टिकोनाबाबत अन्य देशांच्या माहितीत भर पडली. याचबरोबर त्यांच्याशी असलेले संबंधही आणखी दृढ झाले आहेत. या दौऱ्यांनंतर विविध देशांबरोबर भारताचे व्यापार, गुंतवणूक, सामरिक सहकार्य, अंतरिक्ष, पर्यावरण रक्षण, संरक्षण यासह अनेक क्षेत्रांतील द्विपक्षीय करार करण्यात आले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या फौजिया खान यांनी या याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. पंतप्रधानांनी 2015 पासून आजपर्यंत किती देशांचे दौरे केले व त्यावर किती खर्च झाला, असा हा प्रश्‍न होता. मुरलीधरन यांनी उत्तरात मात्र, मार्च 2015 ते नोव्हेंबर 2019 या काळातील तपशील दिला. मोदी यांनी निवडून आल्यावर पहिल्या वर्षी 2014 मध्ये केलेल्या अमेरिका व जपानसह सुमारे 10 देशांच्या दौऱ्यांबाबत यात माहिती नाही. या वर्षी नोव्हेंबरमध्येही पंतप्रधानांचे सौदी अरेबियासह दोन विदेश दौरे प्रस्तावित आहेत. 

 

जागतिक पातळीवर जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय गुन्हे व दहशतवादाविरूध्दची जागतिक लढाई, सायबर सुरक्षा, अण्वस्त्र प्रसाराला रोखणे आदी क्षेत्रांमधील जगाच्या कार्यक्रम  पत्रिकेला प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत भरीव योगदान देऊ लागला आहे. या मुद्द्यांवरील बारताच्या मताची दखल जागतिक पातळीवर आतापर्यंत सर्वाधिक गंभीरपणे घेतली जाऊ लागली आहे, असे त्यांनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख