देशातील कोरोनाचे उग्र रुप पाहून मोदींची बंगालच्या प्रचारातून माघार

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. तरीही पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे.
prime minister narendra modi will not go for campaigning in west bengal
prime minister narendra modi will not go for campaigning in west bengal

नवी दिल्ली : सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असला तरी बंगालमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार सुरू होता. अखेर देशातील कोरोना संकटाचे भयावह रुप पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालच्या प्रचारातून काढता पाय घेतला आहे. आता मोदींनी देशातील कोरोना  परिस्थितीवर लक्ष दिले असून, ते उद्या उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.  

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. परंतु, भाजपने निवडणुकीमुळे कोरोना पसरत नाही, असे सांगत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगासमोर घेतली होती. बंगालमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. 

देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना अनेक उच्च न्यायालये आणि आज खुद्द सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाविषयक उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार नसल्याचे जाहीर केले. मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उद्या (ता.23) मी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक घेत आहे. यामुळे मी पश्चिम बंगालला जाऊ शकणार नाही. 


जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारतात मागील 24 तासांत आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 84 हजार 657 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 14 हजार रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 43 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 91 हजार 428 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.38 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 84.46 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.16 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com