जो बायडन यांचा जरा आदर्श घ्या; चिदंबरम यांचा मोदींना सल्ला - prime minister narendra modi should follow joe biden says p chidambaram | Politics Marathi News - Sarkarnama

जो बायडन यांचा जरा आदर्श घ्या; चिदंबरम यांचा मोदींना सल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे. 

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. यावरुन काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचा आदर्श मोदींना घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता येईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले की, सर्व निवडणुका हिंदुत्व, राम मंदिर, पुलवामा, कलम 370 रद्द करणे, सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्द्यावर जिंकता येतात असा पंतपप्रधान मोदींचा विश्वास आहे. यासाठी ते प्रत्येक विरोधी पक्षाला आणि विरोधी नेत्याला देशविरोधी ठरवतात. आता बिहारची जनताच त्यांना योग्य उत्तर देईल. रोजगार, अन्न, आरोग्यसुविधा, महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास या गोष्टी जनतेसाठी अधिक महत्वाच्या आहेत. त्यांचा आवाज पंतप्रधान मोदी ऐकतील का? 

अमेरिकेप्रमाणेच भारतही दुभंगलेला देश बनला आहे, असे सांगून चिदंबरम म्हणाले की, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी आभारप्रदर्शन करताना जसे भाषण केले तसे भाषण आम्हाला भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांकडून ऐकायचे आहे.  

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला झाला असून, यात ७८ मतदारसंघ होते. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख