मोदी म्हणाले, कोरोना 2014 पूर्वी आला असता तर...विचारही करवत नाही! - prime minister narendra modi inaugurates rashtriya swachhata kendra | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी म्हणाले, कोरोना 2014 पूर्वी आला असता तर...विचारही करवत नाही!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे राजघाटावर उद्घाटन झाले. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वेळी मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. 

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांनी केलेल्या चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी यांची राजघाटावर समाधी असून, याच ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या  वेळी मोदी यांनी देशातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन आधीच्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला लक्ष्य केले. 

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्षे झाल्याचेही निमित्त होते. राजघाटावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वेळी मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेवरील लघुपटही पाहिला. राष्ट्रीय स्वच्छता केंद्रातून डिजिटल आणि बाह्य इन्स्टॉलेशन्सच्या माध्यमातून स्वच्छताविषयक माहिती, जनजागृती आणि शिक्षण आदी गोष्टी केल्या जातील. 

या वेळी बोलताना मोदी यांनी आधीच्या काँग्रेसप्रणित यूपीए सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कोरोनासारखे संकट 2014 च्या आधी आले असते तर काय घडले असते याचा विचार करा. आपण लॉकडाउन यशस्वीपणे राबवू शकलो असतो का? त्यावेळी 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या उघड्यावर  शौचास जात होती. स्वच्छाग्रहामुळे आपण या कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यास सक्षम बनलो आहोत. 

जनतेत आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत ती स्वातंत्र्यासाठी उभी राहत नाही. यामुळे महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेपासून चंपारण ते साबरमती आश्रमापर्यंत कायम स्वच्छतेला आंदोलनाचे साधन बनवले. आता स्वच्छता केंद्राच्या माध्यमातून देशात घडलेला सकारात्मक बदल आपण जगासमोर मांडू. आपल्या भविष्यातील पिढ्यांनीही आपण मिळवलेले यश पाहता येईल, असे मोदी यांनी सांगितले. 

गांधीजी म्हणायचे की स्वातंत्र्य हे फक्त साहसी आणि स्वच्छ लोकच आणू शकतात. स्वच्छता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींमधील संबंधांबाबत गांधीजी ठाम होते. अस्वच्छता सर्वाधिक नुकसान गरीबांचे करते हे त्यांना माहिती होते, असे मोदी यांनी नमूद केले. देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत. या मुद्द्यावरुन सरकारला काँग्रेस धारेवर धरत आहे. आता मोदींनी काँग्रेसला स्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्ष्य केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख