माझा अन् नितीशकुमारांचा कोणी नातेवाईक सत्तेत दिसला आहे का? मोदींचा घराणेशाहीवर प्रहार - prime minister narendra modi criticizes congress and rjd in bihar rally | Politics Marathi News - Sarkarnama

माझा अन् नितीशकुमारांचा कोणी नातेवाईक सत्तेत दिसला आहे का? मोदींचा घराणेशाहीवर प्रहार

वृत्तसंस्था
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जाहीर सभांचा धडाका लावत विरोधकांवर हल्लाबोल केला. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. नितीशकुमारांनी आपला एखादा नातेवाईक राज्यसभेवर पाठविल्याचे किंवा माझा कोणी नातेवाईक संसदेत असल्याचे तुम्ही ऐकले तरी आहे का, असा सवाल करीत मोदींनी घराणेशाहीवर प्रहार केला.  

पंतप्रधान मोदींनी आज छपरा, समस्तीपूर, मोतीहारी, बगहा आणि चंपारण येथे सभा घेतल्या. काँग्रेस- राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) महाआघाडीचे दोन ‘युवराजां’ची सत्तेवर येण्यासाठीची धडपड सुरू आहे, असा टोला मोदींनी लगावला. खराब अन्नामुळे अपचन झाल्यावर आपण ते परत कधी खात नाही, त्याप्रमाणे आरजेडीच्या सत्तेचा अनुभव घेतल्यावर आता पुन्हा त्यांच्या वाटेला जाऊ नका, असे आवाहन करत मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पुन्हा सत्ता देण्याची विनंती केली. 

समस्तीपूर येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, बिहारमध्ये एका बाजूला एनडीए सरकार लोकशाहीला बांधिल आहे, तर दुसऱ्या बाजूला महाआघाडी घराणेशाहीच्या राजकारणात गुरफटलेली आहे. नितीशकुमारांनी आपला एखादा नातेवाईक राज्यसभेवर पाठविल्याचे किंवा माझा कोणी नातेवाईक संसदेत असल्याचे तुम्ही ऐकले तरी आहे का? 

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसची महाआघाडी म्हणजे दोन युवराजांची आघाडी असून त्यांना आपापली सिंहासने राखायची आहेत. राज्यात एनडीए सरकारच्या डबल इंजिनामुळे विकासाचा धडाका असून दुसऱ्या बाजूला दोन युवराजांची सत्तेसाठी धडपड सुरु आहे. यातील एकाला उत्तर प्रदेशात अपयश मिळाले होते. तरीही तो आता बिहारमधील जंगलराजच्या युवराजाच्या मदतीला आला आहे. ते येथेही अपयशी ठरतील, असे मोदी म्हणाले.  

पुलवामा प्रकरणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याची कबुली आपल्या शेजाऱ्यांनीच दिली आहे. यामुळे आपल्याकडील विरोधकांच्या चेहऱ्यावरील मास्क उतरला आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बिहारच्या अनेक सुपुत्रांशी यांना काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त राजकीय फायदे उकळायचे आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख