भारतीय चहाला बदनाम करण्याचं जागतिक षडयंत्र; पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट - prime minister narendra modi on assam tour ahead of assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

भारतीय चहाला बदनाम करण्याचं जागतिक षडयंत्र; पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर होते. 

धेकियाजुली : भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करण्याचे षडयंत्र परकी शक्ती आखत आहेत. भारताची चहाची ओळख पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशाला बदनाम करणाऱ्यांनी आता चहाच्या क्षेत्रालाही सोडले नाही, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. आसामच्या चहाच्या मळ्यात जास्त प्रमाणात किटकनाशकांचा वापर होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचा समाचार मोदींनी घेतला. 

आसाममध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मागील १५ दिवसांतील हा दुसरा आसाम दौरा आहे. मोदींच्या हस्ते आज 'आसाम माला' या राज्य रस्ते प्रकल्पाचे तसेच, विश्‍वनाथ आणि चराइदेव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. ईशान्य भारतात पक्ष विस्तार करण्यासाठी भाजपने आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

काही दिवसांपूर्वी 'ग्रीनपीस' स्वंयसेवी संस्थेने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालाचा उल्लेख न करता पंतप्रधानांनी चहाला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राचा समाचार घेतला. 

मोदी म्हणाले की, आसामची प्रगती ही चहाच्या मळ्यांतील कामगारांच्या प्रगतीशी निगडित आहे. देशाला बदनाम करण्याचे कारस्थान करणारे आता भारताच्या चहालाही सोडत नाहीत. योजनाबद्धरीत्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगात बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचे आहे. याबाबतची काही कागदपत्रेही उघड झाली आहेत. भारतीय चहाला बदनाम करण्याचे काम हाती घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध येथील राजकीय पक्ष गप्प आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना आता प्रत्येक चहा बागायतदार, भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल. त्या सर्वांना याचे उत्तर द्यावं लागेल.

कुणीही कितीही कारस्थाने केली तरी देश त्यांच्या चुकीच्या योजना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही सर्व लढाई जिंकेलच. भारतीय चहावर केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये एवढी शक्ती नाही की ते चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचा सामना करू शकतील, असेही मोदी म्हणाले. 

केंद्र सरकारने चालू अर्थसंकल्पात चहाच्या मळ्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर चहाच्या मळ्यांत काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे. चहाच्या मळ्यांच्या परिसरात फिरती आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिकांच्या भाषेतून त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या डॉक्टरांची फळीही यासाठी तयार केली जाईल, असेही मोदींनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख