जुन्या आखाड्याच्या महंतांनाच थेट पंतप्रधान मोदींचा फोन

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे कुंभमेळा लवकरच आटोपला जाण्याची शक्यता आहे.
prime minister narendra modi appeals avdheshanand giri about kumbh mela
prime minister narendra modi appeals avdheshanand giri about kumbh mela

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा पुढील लवकरच आटोपला जाण्याची शक्यता आहे. याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा वेळेआधीच संपवा, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी आज अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा केली. याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांच्यासोबत आज फोनवर चर्चा झाली. सर्व संतांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली. सर्व संतांकडून प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जात आहे. याबद्दल मी सर्व संतगणांचे आभार मानतो. मी त्यांना विनंती केली आहे की आता दोन शाही स्नान झाले आहेत. कोरोना संकटात कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा. यामुळे या संकटाशी लढण्यास ताकद मिळेल.  

कुंभमेळ्यातून आखाडेही बाहेर पडू लागले आहेत. निरंजनी आखाडा हा कुंभमेळ्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि नागा साधूंचा सर्वांत मोठा आखाडा आहे. या आखाड्यातील अनेक साधू पॉझिटिव्ह आल्याने कुंभमेळ्यातून 17 एप्रिलला बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, अनेक आखाड्यांतील साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सुमारे 50 साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समजते. 

या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आखाड्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला अनेक आखाड्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो दोन दिवसांत आटोपता घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, आखाड्यांमधील काही जण याला विरोध करीत आहेत. परंतु, कोरोना संसर्गाचा प्रकोप पाहता हे आखाडे या मागणीला होकार दर्शवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुंभमेळ्याचा अंतिम निर्णय उत्तराखंड सरकार घेणार आहे. आतापर्यंत सरकारने नियोजित वेळापत्रकानुसार 30 एप्रिलपर्यंत कुंभमेळा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली होती. आता कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने मागील वर्षी दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी मेळ्याची तुलना केली जात आहे. यामुळे उत्तराखंड सरकारही कुंभमेळा लवकर आटोपण्याची तयारी करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com