हाथरसप्रकरणी मौन बाळगणाऱ्या मोदींच्या ट्रम्प यांना तोंडभरून सदिच्छा..! - prime minister narenda modi wishes for speedy recovery of donald trump | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरसप्रकरणी मौन बाळगणाऱ्या मोदींच्या ट्रम्प यांना तोंडभरून सदिच्छा..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

हाथरसमधील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून बळाचा वापर करुन अडवण्यात येत आहे. या प्रकरणी नरेंद्र मोदींच्या मौनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 
 

लखनौ : हाथरस येथील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडविण्यात येत आहे. राज्यातील कायदा व सुव्यस्था स्थितीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नियंत्रण नसल्याची टीका विरोधक करु लागले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत. याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर मोदींनी सदिच्छा संदेश दिला आहे. मोदींना हाथरसमधील पीडितेबद्दल चकार शब्द काढला नाही मात्र, ट्रम्प यांच्या तब्येतीची त्यांना काळजी आहे, असा टोला विरोधकांनी लगावला आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. णमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे.  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या आज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. हाथरस प्रकरणावरुन देशभरात गदारोळ उडालेला असतानाही चकार शब्दही न काढणाऱ्या मोदींनी तातडीने ट्रम्प यांना सदिच्छा दिल्या आहेत. ट्रम्प यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे ट्विट केले होते. हे ट्विट मोदींनी रिट्विट करुन म्हटले आहे की, माझे मित्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी हे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. 

या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हाथरस प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का.. ? या घटनेबाबत मोदींनी जनतेला विश्वास घेऊन सत्य सांगणे गरजेचे आहे. योगी सरकार माध्यमांना का अडवत आहे. माध्यम स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अपमान आहे.

हाथरस घटनेमुळे देशाला धक्का बसला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांसमोर सत्य आणू देणे महत्वाचे आहे. त्या मुलीवर 'ते' अंत्यसंस्कार होते की उत्तरप्रदेश सरकारचा 'तो' पाप लपविण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात एका नटीचे बेकायदा बांधकाम पाडले, ती मुंबईत आल्यावर तिला सरंक्षण देण्यासाठी जे भाजप नेते, दलित नेते पुढे सरसावले होते, ते आता कुठे गेले आहे, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख