धक्कादायक : योगींच्या राज्यात पुजाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न - Priest in Uttar Pradesh village shot at over land dispute | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : योगींच्या राज्यात पुजाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा हाथसरमधील अत्याचार प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. आता राज्यात एका पुजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

गोंडा : हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. आता उत्तर प्रदेशात एका पुजाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

अतुल बाबा उर्फ सम्राट दास असे गोळीबारात जखमी झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो राम जानकी मंदिराचा पुजारी आहे. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. दास यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

या विषयी पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे म्हणाले की, या प्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील महंत सीताराम दास आणि इतर दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

पुजारी दास यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे. दास यांची तिरे मनोरमा गावात सुमारे 30 एकर जमीन आहे. काही गावकऱ्यांशी या जमिनीवरुन त्यांचा वाद आहे. यातूनच हा प्रकार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल पोलीस आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तरीही ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करुन सीबीआयकडे तपास सोपवला आहे. आता सीबीआयने हा तपास हाती घेतला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख