ब्रेकिंग : अखेर मोदी सरकारची सरशी...कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब - President Ram Nath Kovind gives assent to three farm bills passed by the Parliament | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग : अखेर मोदी सरकारची सरशी...कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. अखेर यात सरकारची सरशी झाली आहे.

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून, आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्यात आल्या आहेत. या विधेयकांवर स्वाक्षरी करुन नये, अशी विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, राष्ट्रपतींना अखेर या तीन विधेयकांवर स्वाक्षरी करीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. त्यावर राज्यसभेचीही मोहोर उमटली आहे. देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित कृषी विधेयके राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. याचबरोबर घटक पक्षांची नाराजीही समोर आली आहे.  

कृषी विधेयकांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये शेतकरी या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विरोधी पक्षांनीही जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या विधेयकांना विरोध करीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडले आहे. आता घटक पक्षांच्या नाराजीची मोठी डोकेदुखी सरकारसमोर आहे. सरकारमधील घटक पक्ष बिजू जनता दलाने (बीजेडी) कृषी विधेयकांच्या विरोधात राज्यसभेत भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. अकाली दलाच्या पावलावर पाऊल टाकत नवीन पटनाईक यांचा बीजेडी सरकारची साथ सोडण्याच्या मार्गावर आहे. 

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर पंजाबमधील अकाली दल सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शेजारच्याच भाजपशासित हरियानात राजकीय अस्वस्थता वाढली आहे. याचबरोबर या दोन्ही राज्यांमध्ये या कृषी विधेयकांना विरोध करीत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हरियानात भाजपबरोबर सत्तेत असलेले जननायक जनता पक्षाचे नेते व (जेजेपी) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. चौताला यांनी हमी भावाला सरकार हात लावेल त्या दिवशी राजीनामा देईन, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. 

कृषी विधेयके राज्यांच्या स्वायत्ततेवरील हल्ला असून, शेतमालाची टंचाई अथवा भाववाढ यासारख्या धोकादायक परिस्थितीत राज्ये काहीच करु शकत नाहीत, असे कमल हसन यांनी म्हटले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही विधेयके पुन्हा संसदेला परत पाठवावीत, असे आवाहनही त्यांनी केले होते. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवूनच या प्रकरणी निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी नमूद केले. बड्या कंपन्यांच्या मक्तेदारीसाठी मोदी सरकार हे सर्व करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख