नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती लष्करी रुग्णालयाने दिली आहे. मुखर्जी यांच्या कन्या काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा यांनी आता सर्वकाही देवाच्या हाती असल्याचे म्हटले आहे.
मुखर्जी यांचे वय 84 असून, त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे निदान सोमवारी झाले होते. याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मी रुग्णालयात तपासणीसाठी गेलो होतो. त्यावेळी माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी स्वत: विलगीकरणात राहावे.
लष्करी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी यांच्या मेंदूत गाठ आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर 10 ऑगस्टला तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती उलट ढासळत आहे. ते सध्या व्हेटिंलेटरवर आहेत.
मुखर्जी हे लवकर बरे व्हावेत यासाठी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी किरनहर येथे प्रार्थना करण्यात येत आहे. गावातील नागरिकांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कालपासून 72 तासांचा यज्ञ सुरू केला आहे. या पूजेत मुखर्जी यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. मुखर्जी हे नित्यनेमाने दरवर्षी दुर्गापूजेसाठी किरनहरला भेट देत असत. किरनहरपासून काही किलोमीटर अंतरावर मुखर्जी यांच्या पूर्वजांचे गाव मिरीती आहे. तेथेही मुखर्जी यांचे कुटुंबीय पूजा करीत आहेत.
मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या प्रकृतीबाबत ट्विट केले आहे. माझ्या बाबांबाबत आता देवानेच योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो स्वीकारण्यासाठी मला बळ द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी याचवेळी त्यांना भारतरत्न मिळाला होता. मागील वर्षीचा 8 ऑगस्ट हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस होता. आता वर्षानंतर 10 ऑगस्टला ते गंभीर आजारी पडले आहेत. ईश्वराने त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो स्वीकारण्यास मला बळ द्यावे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.