मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्य केले आहे. मोदी आणि ठाकरेंनी आधी लस घ्यावी मग इतरांना सांगावे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास कालपासून (ता.16) देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला होता. तीन कोटी लोकांना लस मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.
आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जुन्या काळात राजे जेव्हा शिकारीला जायचे त्यावेळी अख्खे जंगल हाकले जायचे. जंगल हाकल्यासारखं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे लोकांना सांगताहेत तुम्ही लस टोचून घ्या, पण स्वतः लस टोचायला तयार नाहीत.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे फ्रंटलाईन वॉरियर आहेत. इतर वॉरियरना सक्ती केली जात आहे, मग पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लस का टोचून घेत नाहीत. ते लस घेत असतील तर ते टीव्हीवर दाखवावं आणि कधी लस घेतील हेही सांगावं, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोरोना लशीच्या सुरक्षिततेविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पहिल्यांदा स्वत: लस घेतली आहे. याबाबतचा व्हिडीओ पूनावाला यांनी ट्विट केला होता. यात ते लस टोचून घेताना दिसत होते. त्यांनी म्हटले होते की, मी कोरोना लस घेत आहे. कोरोनाविरोधात आघाडीवर असणारे कर्मचारी आणि आरोग्यसेवकांना ही लस देण्यात येत आहे. तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता समोर यावी, हा माझा हेतू आहे.
केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.