प्रकाश आंबेडकर म्हणाले, "पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा.." - Prakash Ambedkar said, "Prepare for agitation in Pandharpur." | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झाले नाही, तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश करतील. लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.  

मुंबई : राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल.

त्यामुळे सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. पानटपऱ्या केस कर्तनालाय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरू झाले.

मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. सरकारला इशारा दिलेला आहे ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहनही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.  

सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे खुली करा : रामदास आठवले 
 मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. त्यात सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद केली होती. आता कोरोनापासून बचाव व खबरदारी घेण्याचे जनतेचे प्रबोधन झाले आहे. त्यामुळे आता भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर खुली करावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केली आहे.  याबाबतच्या मागणीचे पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 

मुस्लिम समाजाच्या वतीने रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाने मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देऊन मस्जिद सुरू करण्याची मागणी केली.नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस देरासर सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाईंच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाने श्री. आठवले यांना दिली. त्यावर सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवित असल्याचे श्री. आठवले यांनी सांगितले. 

कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रणात येत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रार्थनास्थळे ही सुरू करावीत, अशी मागणी करून श्री. आठवले म्हणाले, मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचा नियम पाळून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख