शिवसेनेतील वाढत्या भांडणांची ठाकरेंना डोकेदुखी!

शिवसैनिकांना शिवसेनेचे नेते धारातीर्थी पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) विधीमंडळातील राजकारण बरोबर ५१ वर्षांपूर्वी सुरू झाले. परळ विधानसभा मतदारसंघातीत पोटनिवडणूक जिंकत शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत पोहोचला. त्यानंतर शिवसेनेचा आज राज्यात मुख्यमंत्री आहे. पहिला आमदार ते मुख्यमंत्री असा शिवसेनेचा मोठा प्रवास आहे.

या प्रवासात अनेक शिवसैनिकांनी जिवाचे रान केले आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी पक्ष संघटनेत मात्र, मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. या आरोपांमुळे शिवसेनेत सध्या काय चालले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामुळे अनेक वर्षांपासून शिवसेनेचा मुख्यमंत्री ही शिवसैनिकांची ईच्छा पूर्ण झाली. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या ताकदीच्या जोरावर मुंबई पासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवला त्याच शिवसैनिकांना शिवसेनेचे नेते धारातीर्थी पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांतील वाद अधुनमधून रंगत असतात. पण खुद्द सेनेतच अशा वादांनी उग्र रूप घेतल्याचे दिसून येत आहे. सरकार चालविण्याच्या जबाबदारीत संघटनेकडे उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष होत आहे का, अशी शंका त्यामुळे स्थानिक नेत्यांना येते आहे. अर्थात ठाकरे हे कोणतीही गोष्ट घाईत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी नेत्यांच्या अशा घातकी वागणुकीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नसावे, अशीही चर्चा आहे.

CM Uddhav Thackeray
खासदार म्हणाले, हा काय तमाशा? महिला चिडल्या अन् मागितला राजीनामा…

माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवल्याचे बोलल्याचे दिसून येत आहेत. त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वादळ उठले होते. या प्रकरणामुळेच त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही दांडी मारली.

या प्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच हिंगोलीमध्येही याच घटनेची पुवरावृत्ती झाली. शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार संतोष बांगर यांनी माजी मंत्री शिवसेना नेते जयप्रकाश मुंदडा यांच्यावर आरोप केले आहेत. मुंदडा यांनी लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करून शिवसेनेच्या खासदाराला तीन वेळा पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी खळबळ उडवूव दिली. मुंदडा यांनी अनेक निवडणुकांत अशीच गद्दारी केल्याचे सांगत त्यांच्याविरोधातलवकरच शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन 'मातोश्री'वर जाणार असल्याची घोषणा आमदार बांगल यांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंदडा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन राज्य कारभार व्यवस्थितपणे चालवत आहे, असा संदेश शिवसेनेतून जाण्याऐवजी सेनेतील वादच चव्हाट्यावर येत आहेत. शिवसेनेला व शिवसैनिकांना अडचणीत आण्याचा चंग पक्षाच्या नेत्यांनी व माजी मंत्र्यांनी बांधला आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. याच जिल्ह्यातील मुंदडा यांनी जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती व वसमत बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील त्या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.

CM Uddhav Thackeray
हेच ते पत्र ज्यामुळे रामदास कदम अडचणीत आले

दुसरीकडे नगरचे शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत धुसफुस सुरू झाली. राठोड असतानाच निर्माण झालेले शिवसेनेचे दोन गट राठोड गेल्यावर सोशल मीडियावरून भांडताना दिसले. एका गटाने राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. आम्हा सर्व एक आहोत असे जाहीर सांगण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी शिवसेनेचे हाडवैर आहे. असे असतानाही एक गटाने शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांच्या दबावाने नगर महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली. यात शिवसेनेचे भाकरे कुटुंब नाराज झाले. महापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एका हॉटेलमध्ये शिवसैनिक आपसात भिडले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनाच शिवीगाळ झाली. संपर्क प्रमुखांची जीभही प्रसारमाध्यमांवर घसरली. या प्रकरणाने शिवसेनेचे दोन गट प्रकर्षाने दिसून आले.

या उघडपणे भांडल्या जाणाऱ्या वादाच्या घटना आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी छुपी नाराजी असू शकते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला काबूत ठेवत भाजपला तोंड देण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. प्रत्यक्षात स्वपक्षातच इतके वाद सुरू आहेत की मुंबई वगळता सेनेकडे कोणाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com