पोलिसांची दडपशाही...शेतकरी आंदोलनातील हिरोवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा - police registers attempt murder case against protesting young farmer | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांची दडपशाही...शेतकरी आंदोलनातील हिरोवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. या आंदोलनात हिरो ठरलेल्या तरुण शेतकऱ्यावर खुनाच्या प्रयत्नाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. देशभरातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आंदोलनासाठी दिल्लीत पोचत आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर होत आहे. पोलिसी बळाला निधड्या छातीने तोंड देत वॉटर कॅनन बंद करणारा तरुण शेतकरी हा सोशल मीडियावर हिरो ठरला होता. आता या तरुण शेतकऱ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा पराक्रम पोलिसांनी केला आहे. 

नवदीपसिंह असे या  तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत आंदोलक शेतकऱ्यांवर वॉटर कॅननमधून पाण्याचा फवारा मारण्यात येत होता. त्यावेळी 26 वर्षांचा नवदीप धाडसाने पोलिसी कडे तोडून वॉटर कॅननवर चढला होता. त्याने वॉटर कॅनन बंद केला होता. त्याचा या धाडसी पराक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्याला हिरो ठरवण्यात आले होते. 

नवदीपचे पिता जयसिंह हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. नवदीप हा मूळचा हरियानातील अंबाला येथील आहे. त्याच्यावर पोलिसांनी आता खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. याचबरोबर दंगल करणे आणि कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

याबाबत नवदीप म्हणाला की, माझ्या शिक्षणानंतर शेतकरी नेते असलेल्या वडिलांसोबत मी शेती करण्यास सुरवात केली. मी कधीही चुकीचे कृत्य केलेले नाही. आंदोलक शेतकऱ्यांचे मनौधैर्य पाहून मला वॉटर कॅननवर चढून पाण्याचा फवारा बंद करण्याचे बळ आले. कारण आंदोलक शेतकऱ्यांना याचा त्रास होत असूनही ते तेथेच आंदोलन करीत उभे होते. 

आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करीत दिल्लीत जाण्याची परवानगी मागत होतो. मात्र, आम्हाला सीमेवर अडवून ठेवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी आमचा रत्ता रोखून धरला होता. सरकारला प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. सरकार जर लोकहित विरोधी कायदे करीत असेल तर आम्हाला आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, असेही नवदीप म्हणाला. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरयाना आणि दिल्लीतील पोलील टीकेची धनी बनले आहेत. भाजपशासित हरियानात शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून ठेवले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुरारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर उद्याप अडकून पडले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख