अर्णब गोस्वामी म्हणाले, पोलिसांनी मला जबरदस्तीनं कायतरी पाजलं! - police forced drink some liquid alleges arnab goswami in high court | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी म्हणाले, पोलिसांनी मला जबरदस्तीनं कायतरी पाजलं!

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. अटकेच्या विरोधात गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज झालेल्या सुनावणीवेळी गोस्वामी यांना पोलिसांना जबरदस्तीने काहीतरी पाजले आणि यामुळे त्यांचा श्वास गुदमरला, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.  

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांनी रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. यामुळे त्यांचा मुक्काम सध्या तुरुंगात आहे. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

उच्च न्यायालयात यावर काल सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी काल तहकूब करीत आज दुपारी ठेवली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि एम.एस.कर्णिक यांच्यासमोर आज ही सुनावणी अद्याप सुरू आहे. 

आज गोस्वामींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडली. गोस्वामी यांना पोलिसांनी काहीतरी द्रव्य जबरदस्तीने पाजले. यामुळे त्यांच्या श्वास कोंडला होता. याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाडजूड बुटांनी त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या डाव्या हातावर अर्ध्या फुटाचा व्रण उमटला आहे. याचबरोबर मणक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे, असे त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख