अटल बोगद्याची सोनिया गांधींनी पायाभरणी केलेली कोनशिलाच गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग ‘अटल टनेल’चे नुकतेच उदघाटन झाले. या बोगद्याचे भूमिपूजन काँग्रेसने केल्याची कोनशिलाच गायब झाली आहे.
plaque of atal tunnel foundation gone missing after inauguration
plaque of atal tunnel foundation gone missing after inauguration

नवी दिल्ली : मनाली ते लडाखला जोडणाऱ्या रोहंताग अटल बोगद्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा ९.२ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. या बोगद्याचे भूमिपूजन काँग्रेसच्या काळात झाले होते. त्यावेळी बसवलेली कोनशिला बोगद्याच्या उद्धाटनावेळी गायब झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेसने भाजपकडे बोट दाखवले आहे. 

सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) या बोगद्याची उभारणी केली आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ३०६० मीटर उंचीवर आहे. बोगदा पूर्ण होण्यास दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. या बोगद्यामुळे मनाली ते केलॉंग अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे. बोगद्यातून दररोज ३ हजार मोटारी आणि १५०० ट्रक धावणार आहेत. बोगद्याची रुंदी १०.५ मीटर असून, ८० किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावणार आहेत. प्रत्येक १५० मीटर अंतरावर  बोगद्यात आपत्कालिन टेलिफोन यंत्रणा आहे. याचबरोबर प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

अटल बोगद्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री जयराम ठाकूर, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख एम.एम.नरवणे, बीआरओचे महासंचालक लेप्टनंट जनरल हरपाल सिंग आदी उपस्थित होते. 

या बोगद्याचे भूमिपूजन केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना झाले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता. त्याची कोनशिला बोगद्यावर लावण्यात आली होती. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनावेळी पायाभरणीची कोनशिला नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. या प्रकरणी काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. भाजपने हे जाणीवपूर्वक केले असून, पायाभरणीची कोनशिला लावेपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. 

हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीपसिंह राठोड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे. राठोड यांनी म्हटले आहे की, बोगद्याची कोनशिला गायब होण्याची चौकशी 15 दिवसांत पूर्ण करावी आणि कोनशिला तेथे पुन्हा बसवावी. सरकारने हे केले नाहीत तर राज्यभरात आंदोलन छेडले जाईल. 

बोगद्यात अपघातांची मालिका 

या बोगद्यात अपघाताच्या तीन घटना घडल्याचे समोर आले आहे. अतिवेगात आणि निष्काळजीपणे गाड्या चालवत असल्याने हे अपघात झाले आहेत. या बोगद्यात पर्यटक वेगाने वाहने चालवताना तसेच मोटारींच्या शर्यती लावत असल्याची बाब पुढे आली आहे. तसेच बोगद्याबाहेर आणि बोगद्यात सेल्फी घेत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बीआरओने बोगद्यात पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हा बोगदा काही दिवस दररोज सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत बंद राहणार असल्याचे बीआरओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com