सरकारची भरली झोळी; पेट्रोलवर 220 टक्के अन् डिझेलवर 600 टक्के जादा करवसुली - petrol and diesel taxes raised by narendra modi government over 7 years | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारची भरली झोळी; पेट्रोलवर 220 टक्के अन् डिझेलवर 600 टक्के जादा करवसुली

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मार्च 2021

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव घसरुनही दरवाढ कमी झालेली नाही. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

हेही वाचा : खनिज तेलाचे भाव घसरुनही पेट्रोल अन् डिझेल महागच

केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आधी वर्षाला 72 हजार 160 कोटी रुपये मिळत होते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या दहा महिन्यांतच सरकारने यातून 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचवेळी सर्वसामान्यांचा विचार करता 2014 पासून त्यांच्या उत्पन्नात केवळ 36 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. 

2014-15 एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न 72 हजार 889 रुपये होते आणि 2020-21 मध्ये ते 99 हजार 155 रुपयांवर पोचले आहे. मागील वर्षी नागरिकांच्या उत्पन्नात 9 टक्के घट झाली आहे. 2019-20 मध्ये एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1.08 लाख रुपये होते आणि 2020-21 मध्ये 99 हजार 155 रुपयांवर आले. सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कातून 2019-20 या वर्षात 2.39 लाख कोटी रुपये कमावले होते. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दहाच महिन्यांत 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात 23 टक्के वाढ झाली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख