जागतिक पातळीवर डॉलरमध्ये घसरण अन् देशात कपात मात्र पैशांत! - petrol and diesel prices slashed in country for third time in month | Politics Marathi News - Sarkarnama

जागतिक पातळीवर डॉलरमध्ये घसरण अन् देशात कपात मात्र पैशांत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मार्च 2021

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून, तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ कपात सुरू आहे. 

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सुएझ कालव्यातील जलवाहतूक कोंडी अखेर सुटल्याने जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले आहेत. असे असताना देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात किरकोळ कपात करण्यात आली आहे. आज पेट्रोलच्या दरात 22 पैसे आणि डिझेलच्या दरात 23 पैशांची कपात करण्यात आली.  या महिन्यात पेट्रोलच्या दरात एकूण 61 पैसे आणि डिझेलच्या दरात 60 पैसे कपात झाली आहे. 

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात डॉलरमध्ये घट होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पैशांमध्ये सुरू असलेल्या कपातीवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव घसरत असूनही दरात मोठी कपात होत नसल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ कायम आहे. सुएझ कालव्यातील जलवाहतूक कोंडी सुटल्याने खनिज तेलाचे भाव कमी झाले आहेत. जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले आहेत. खनिज तेलाच्या भावात घट होऊन तो प्रतिबॅरल 64.83 डॉलरवर आला आहे. मागील आठवड्यात खनिज तेलाच्या भावात चार टक्के घट झाली होती. 

पेट्रोलच्या दरात आज 22 पैसे तर डिझेलच्या दरात 23 पैशांनी कपात करण्यात आली. ही कपात किरकोळ असल्याने ग्राहकांना पुरेसा दिलासा मिळणार नाही. भविष्यात खनिज तेलाचे भाव आणखी कमी होत गेल्यास कंपन्यांकडून दर आणखी कमी केले तरच ग्राहकांच्या खिशावरील बोजा कमी होणार आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सहा महिने कपात झाली नव्हती. त्यानंतर 24 व 25 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ कपात झाली होती. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरु लागले आहेत. यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे अपेक्षित होते. 

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर 
दिल्ली : पेट्रोल 90.56, डिझेल 80.87 
मुंबई : पेट्रोल - 96.98, डिझेल - 87.96  
चेन्नई : पेट्रोल - 92.58, डिझेल - 85.88 
कोलकता : पेट्रोल 90.77, डिझेल 83.75 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख