बिहारमधील 53 टक्के जनतेला वाटतंय निवडणुकीनंतर चिराग अन् तेजस्वी एकत्र येणार - People of Bihar says LJP can join hands with the RJD after the polls | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमधील 53 टक्के जनतेला वाटतंय निवडणुकीनंतर चिराग अन् तेजस्वी एकत्र येणार

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

चिराग पासवान हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत आहेत मात्र, भाजपला पाठिंबा देत आहेत. चिराग यांच्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडले आहेत. याचवेळी त्यांनी केंद्रात एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. चिराग यांच्या या भूमिकेमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर चिराग आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे दोघे निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात, असा धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय एनडीएतून एलजेपी बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) लक्ष्य करीत आहेत. चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत मोदींसोबत राहू, असे चिराग जाहीरपणे बोलत आहेत. चिराग हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. 

या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये 'सी व्होटर'ने सर्वेक्षण केले आहे. निवडणुकीनंतर एलजेपी हा आरजेडीशी युती करेल का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर तब्बल 53.3 टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले आहे तर 46.7 टक्के नागरिकांनी नाही उत्तर दिले आहे.

चिराग हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत वेगळे झाले आहेत. याचवेळी तेजस्वी यादव यांचाही रोख नितीशकुमारांवरच आहे. यामुळे निवडणुकीनंतर नितीशकुमारांच्या विरोधात चिराग आणि तेजस्वी हे हातमिळवणी करतील, असे लोकांना वाटत आहे. पूर्व बिहारमधील सर्वाधिक 63 टक्के नागरिकांना हे दोघे पुढे एकत्र येतील, असा विश्वास वाटत आहे. 

भाजप आणि एलजेपी यांची छुपी युती आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर 61 टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले. याचवेळी 39 टक्के नागरिकांनी नाही उत्तर दिले आहे. उत्तर बिहारमध्ये 58.4 टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले आहे तर पूर्व बिहारमध्ये होय उत्तर देणाऱ्या नागरिकांची संख्या 63 टक्के आहे. 

चिराग पासवान यांनी बिहारमध्ये स्वंतत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे ते पंतप्रधान मोदींचे कौतुक करीत निवडणुकीनंतर आघाडी स्थापन करण्याचा दावा करीत आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असे वाटते का? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर 57.5 टक्के नागरिकांना होय उत्तर दिले आहे. याचवेळी 42.3 टक्के नागरिकांनी नाही उत्तर दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख