म्युकरमायकोसिस झालाय...गड्या आपलं सरकारी रुग्णालय बरं! - patients with black fungus infection moving to government hospitals from private | Politics Marathi News - Sarkarnama

म्युकरमायकोसिस झालाय...गड्या आपलं सरकारी रुग्णालय बरं!

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

देशात कोरोनाचा कहर वाढला असून, यात आता म्युकरमायकोसिस आजाराची भर पडली आहे. या आजारावरील औषधाची टंचाई निर्माण झाली आहे. 

बंगळूर : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या रुग्णांना अॅम्फोटेरिसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण या औषधाच्या आशेने सरकारी रुग्णालयांत दाखल होऊ लागले आहेत. 

म्युकरमायकोसिसवरील लिपोसोमल अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनची मोठी टंचाई  कर्नाटकात निर्माण झाली आहे. हा आजार झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना डॉक्टर हे इंजेक्शन आणण्यास सांगत आहेत. परंतु, हे इंजेक्शन बाजारात उपलब्धच नाही. हे इंजेक्शन न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनाही हे औषध कुठे मिळेल याची कल्पना नाही. अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हा आजार झालेल्या रग्णांना 50 ते 100 डोस द्यावे लागतात आणि किमान दोन आठवडे रुग्णालयात राहावे लागते. 

खासगी रुग्णालये राज्याच्या औषध नियंत्रक कार्यालयाकडून या इंजेक्शनची खरेदी करतात. याचवेळी कर्नाटक सरकारकडून सरकारी रुग्णालयांना पुरवठा होतो. रुग्णाच्या वजनाच्या प्रतिकिलोला 5 एमजी एवढे इंजेक्शन सर्वसाधारणपणे द्यावे लागते. या औषधाची टंचाई असल्याने खासगी रुग्णालयांना ते मिळत नसल्याचे चित्र आहे. मग खासगी रुग्णालये हे औषध रुग्णांना सरकारी रुग्णालयातून आणण्यास सांगत आहेत. 

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय : म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पाच कंपन्यांना परवाना 

सरकारी रुग्णालयात औषध मिळेल या आशेने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होऊ लागले आहेत. परंतु, सरकारी रुग्णालयातही औषधाची टंचाई आहे. या विषयी बोलताना मिंटो ऑप्थॅलमिक इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. सुजाता राठोड म्हणाल्या की, खासगी रुग्णालयात बेड मिळूनही रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल होत आहेत. सरकारी रुग्णालयात हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे हे खोटे आहे. आम्हालाही औषधांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या आमच्या येथे 54 रुग्णांवर उपचार सुरू असून, आम्हाला केवळ 100 डोस मिळाले आहेत. प्रत्येक रुग्णाला दररोज 5 डोस द्यावे लागतात. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख