भाजप प्रवेशासाठी मदन भोसलेंना कार्यकर्त्यांचा ग्रीन सिग्नल 

भाजप प्रवेशासाठी मदन भोसलेंना कार्यकर्त्यांचा ग्रीन सिग्नल 

वाई : भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांनी गळ घालून पायघड्या घातल्या आहेत. या परिस्थितीत कॉंग्रेसच्या चौकटीतून बाहेर न पडण्याचा निर्णय घेणारे वाईचे माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आज वेळे (ता. वाई) येथे वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांची याबाबत मते जाणून घेतली. यामध्ये बहुतांशी कार्यकर्त्यांनी आपल्या भवितव्यासाठी व कारखान्यांच्या सभासदांच्या हितासाठी भाजप प्रवेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे तीन तालुक्‍यांतील कारखान्याच्या सभासदांनी मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशाला आज ग्रीन सिग्नल दिला आहे. दरम्यान, सर्वांची मते जाणून घेतल्यानंतरही मदन दादांनी आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. 

भाजप प्रवेशासाठी सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन माजी आमदार मदन भोसले यांनी वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्ते, कारखान्यांचे संचालक, सभासद यांची वेळे येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी शंकरराव गाढवे, लक्ष्मी कऱ्हाडकर, रोहिदास पिसाळ, किसनराव भिलारे, जयवंतराव केंजळे, खंडुशेठ सारडा, राजेंद्र कदम, शेखर शिंदे, दिलावर बागवान, वाई खंडाळ्यातील कारखान्याचे संचालक, व सभासद असे साडे सातशे कार्यकर्ते उपस्थित होते. 

बैठकीत सुरवातीला सर्वांनी आपापली मते मांडली. यामध्ये कॉंग्रेस पक्षाशी आपली नाळ जोडलेली आहे. त्यामुळे इतके वर्षे आपण पाळलेली तत्वे सोडायची का, असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला. तर काही कार्यकर्त्यांनी खंडाळा साखर कारखान्याला मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मदत केली आहे. तसेच यावेळेस अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत केली आहे. त्यामुळे खंडाळा व वाई तालुक्‍यातील कारखान्याच्या 52 हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा. लोणंद येथील कॉंग्रेसच्या मेळाव्यास मदन भोसले यांना डावलल्याबद्दल ही सर्वांनी नाराजी व्यक्त केली.

कॉंग्रेसचा तालुक्‍याचा मेळावा असताना मदन दादांना बोलावले नाही. मुळात कोणालाही विश्‍वासात न घेता ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने पत्रिका छापल्या व त्यातून दादांचे नाव वगळण्यात आले होते. यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वत: जाऊन या चुकीबद्दल माफी मागितली होती. मात्र, तरीही दादांनी या कार्यक्रमाशी माझा काहीही संबंध नाही, मी येणार नाही, असे सांगितले होते. हा संदर्भही एका ज्येष्ठ नेत्यांनी सर्वांपुढे मांडला.

यासर्व प्रकारानंतरही पृथ्वीराज चव्हाण यांनी मदन भोसलेंच्या विरोधात टिका करायला नको होती, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. खंडाळा, वाई व महाबळेश्‍वर तालुक्‍यातील जनता गेल्या दोन पंचवार्षिक मदन भोसलेंच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे बहुतांशी कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी व कारखान्यांच्या 52 हजार सभासदांच्या हितासाठी मदन दादांनी भाजप प्रवेश करावा, अशी भुमिका मांडली. त्यामुळे भाजप प्रवेशाचा चेंडू आता पुन्हा एकदा मदन भोसले यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे येत्या काळात वाई तालुक्‍यात परिवर्तनाची नांदी पहायला मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारातील ताकदवान नेता भाजपकडे नाही. त्यामुळे ते मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी आग्रही राहिले आहेत. खंडाळा व किसन वीर कारखान्याला मदतीनंतर त्यांनी मदन दादांना त्यांनी पायघड्याच घातल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मदन भोसले यांच्याशी संपर्क करून मी कोल्हापूरला जाताना तुम्हाला भेटायला येतो, असे सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदन भोसलेंचा भाजप प्रवेश घ्यायचा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com