खबरदार...जर मोदींचा फोटो वापराल! भाजपचा पासवान यांना अप्रत्यक्ष इशारा - parties outside nda can not use pm narendra modis photo says bjp | Politics Marathi News - Sarkarnama

खबरदार...जर मोदींचा फोटो वापराल! भाजपचा पासवान यांना अप्रत्यक्ष इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाआघाडी आणि एनडीएचे जागावाटप जाहीर झाले असून, या आघाड्यांमधील बिघाडी समोर येत आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला आहे. एलजेपीने एकाच वेळी नितीश यांना विरोध आणि भाजपला पाठिंबा अशी भूमिका घेतली आहे. यावरुन एनडीएमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अखेर भाजपने या प्रकरणी एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनाच अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देऊन एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते. पक्षाने राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एनडीएतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप आणि जेडीयूने 122-121 असे जागावाटप केले आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या कोट्यातील काही जागा सहकारी पक्षांना द्याव्या लागणार आहेत. जेडीयूच्या वाट्याला आलेल्या जागा सहकारी पक्षाला द्याव्या लागणार आहेत. जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला जेडीयूच्या कोट्यातील सात जागा द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चिराग पासवान यांनी राज्य पातळीवर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर ते एनडीएमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर ते निवडणुकीत करु शकतात, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबद्दल भाजप नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी चिराग पासवान यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 

मोदी यांनी म्हटले आहे की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, काही अपक्ष उमेदवार आणि बिहारमधील सुमारे डझनभर पक्ष मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचा वापर करण्याची शक्यता आहे. याबद्दल गरज पडल्यास आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहणार आहोत. भाजप, जेडीयू, व्हीआयपी आणि एचएएम हे पक्ष एकत्रित निवडणूक लढत असून, तेच केवळ पंतप्रधान मोदींचे छायाचित्र वापरू शकतात. इतर कोणी असा वापर केल्यास निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी. 

महाआघाडीच्या जागावाटपाची दोन दिवसांपूर्वी घोषणा होताच मुकेश साहनी यांच्या व्हीआयपीने दुसऱ्याच क्षणी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आरजेडीने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालपर्यंत त्यांनी राज्यातील सर्वच सर्व 243 जागा लढविण्याची तयारी जाहीर केली होती. अखेर त्यांनी एनडीएमध्ये जाणे पसंत केले आहे. भाजपकडून व्हीआयपीला नेमक्या किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख