पंकजा मुंडे म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.. - pankaja munde says first police cases against workers and now leader | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन दसरा मेळावा घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काल ऑनलाइन दसरा मेळावा घेतला होता. हा मेळावा ऑनलाइन असला तरी गर्दी जमवून नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी पंकजा मुंडेंसह एक खासदार, दोन आमदार अन् माजी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंनी आधी कार्यकर्ते आणि आता माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असा हल्लाबोल केला आहे. 

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे काल दसरा मेळावा झाला. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑनलान मेळावा झाला. या वेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, भिमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे आदी उपस्थित होते. 

हा मेळावा ऑनलाइन असल्याने नागरिकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पंकजा यांच्यासह मेळाव्याला उपस्थित इतर नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. यामुळे पोलिसांनी पंकजा मुंडे, खासदार कराड, आमदार राजळे, बोर्डीकर आणि जानकर यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, कलम 51(ब) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यांत होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..

काल या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मला तोडण्याचा प्रयत्न झाला, मी राजकारण सोडलं, घरात बसले असा अपप्रचार करण्यात आला. मात्र,  मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धे ज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र, मला चक्रव्यूह तोडता येते. हा मेळावा एकदिवस शिवतिर्थावर घेणार आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, नुकसानभरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत व अभिनंदन. मात्र, हे पॅकेज पुरेसे नाही, एवढ्या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही,मायबाप सरकारने उदारता दाखवावी, अन्यथा रस्त्यावर उतरु. ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का? 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख