दाऊद पाकिस्तानातच..पाकनेच त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या! - pakistan government put curbs on hafiz saeed and dawood ibrahim | Politics Marathi News - Sarkarnama

दाऊद पाकिस्तानातच..पाकनेच त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

कुख्यात गँगस्टर आमच्याकडे नाहीच, असे वारंवार ठासून सांगणाऱ्या पाकिस्तानने अखेर तो त्यांच्या देशात असल्याची कबुली दिली आहे. 

इस्लामाबाद : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याची चर्चा वारंवार सुरू असते. नेहमी पाकिस्तानकडून त्याच इन्कार केला जातो. मात्र, खुद्द पाकिस्तानने दाऊद त्यांच्याकडेच असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचा भारताने जागतिक पातळीवर सातत्याने केलेला दावा अखेर खरा ठरला आहे.  

दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यात येत आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत मागील काही काळात कमी करण्यात आली आहे. याचबरोबर ही मदत रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याची मोहीम सुरू आहे. 

पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्याने अखेर पाकिस्तानने देशातील 88 दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध लादले आहेत. यात हाफीज सईद, मसूज अजहर आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. या निर्बंधानुसार दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांची सर्व मालमत्ता आणि बँक खाती गोठविण्यात येणार आहे. 

पॅरिसस्थित फायनान्शियल टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला जून 2018 मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. याचबरोबर 2019 च्या अखेरपर्यंत दहशतवाद्यांवरील कारवाईचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले होते. कोरोनाच्या महामारीमुळे ही मुदत नंतर वाढविण्यात आली होती. 

पाकिस्तान सरकारने 18 ऑगस्टला दोन अधिसूचना काढल्या आहेत. यात 88 दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यात मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद, जैशे महंदमचा प्रमुख मसूद अजहर आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या समावेश आहे. 

पाकिस्तान सरकार या दहशतवाद्यांची सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करणार आहे. याचबरोबर वित्तीय संस्थांमधून या दहशतवाद्यांना पैसे हस्तांतर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना परदेशातही प्रवास करता येणार नाही. तसेच, तेहरिके तालिबान या अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवादी संघटनेचे सर्व म्होरके आणि सदस्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. 

 Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख