पश्चिम गोदावरी : आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरूमध्ये गूढ आजारामुळे सुमारे 340 जण आजारी पडले आहेत. यातील 157 जणांवर अद्याप उपचार सुरू असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या आजारात रुग्णांना उलट्या, चक्कर आणि अपस्मार अशी लक्षणे दिसून येत आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ उडाली असून, राज्य सरकारनेही वेगाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
A total of 340 people have fallen sick in Andhra Pradesh' West Godavari out of which 157 people are undergoing treatment. One person has died. Patients complain of epilepsy, vomiting, headache, backache, general weakness & mental tension: District Collector in a report https://t.co/esAegSBQih
— ANI (@ANI) December 7, 2020
या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आज एलुरूला भेट देऊन रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. एलुरूमध्ये शनिवारी (ता.5) रात्रीपासून शेकडो नागरिक अचानक आजारी पडूल लागले आहेत. हा आजार नेमका कोणता आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असताना एका रुग्णाचा आजारामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सुरवातीला ५५ जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर ही संख्या दोनशेवर पोहोचली. ही संख्या वाढतच आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या सर्वांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि अपस्मार यासारखी लक्षणे दिसत होती. या सर्वांवर उपचार करण्यात आल्यानंतर रविवारी सायंकाळी अनेकांना घरी सोडण्यात आले.
एलुरूमधील वेगवेगळ्या भागातील पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले होते. यातील तपासणी अहवालात काहीही आढळलेले नाही. पाण्यात धातूचे प्रमाण अधिक आहे का हे तपासण्यासाठीही चाचणी करण्यात आली होती. याच्याही अहवालात काही आढळलेले नाही. उकळलेले पाणी आणि मिनरल वॉटर पिणारेही आजारी पडत असल्याने या आजाराचे कारण पाणी नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
या सर्वांचे रक्ताचे तसेच खाण्या-पिण्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन आणि एक्सरे अहवाल सामान्य आहेत. ही लक्षणे आढळून आल्याने रुग्णालयात आलेले रुग्ण विविध भागांतील आहेत. त्यांचा एकमेकांशी संपर्कही आलेला नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
Edited by Sanjay Jadhav

