शहांवरील नाराजीचा फायदा; सहकारी पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा अन् आघाडीचे नेतृत्वही

देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पुदुच्चेरीत भाजपच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
nr congress and bjp finalise alliance in puducherry assembly election
nr congress and bjp finalise alliance in puducherry assembly election

नवी दिल्ली : देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पुदुच्चेरीत भाजपप्रणित एनडीए जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नाराज असलेल्या एनआर काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. याचबरोबर आघाडीचे नेतृत्वही एनआर काँग्रेसचे सर्वेसर्वा एन. रंगास्वामी करणार आहेत. याचवेळी भाजप आणि द्रमुकला उरलेल्या जागा वाटून घ्यावा लागणार आहेत. 

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक होणार आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. 

आता एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास भाजपने तयारी दाखवली आहे. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या काही विधानांमुळे एनआर काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण होते. रंगास्वामी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. अखेर भाजपने त्यांच्याशी आघाडी केली आहे. एनआर काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. 

विधानसभेच्या एकूण 30 जागांपैकी 16 जागा एकट्या एनआरा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. उरलेल्या 14 जागा भाजप आणि द्रमुकमध्ये वाटून घ्याव्या लागणार आहेत. याबाबतची घोषणा भाजपचे पुदुच्चेरी प्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी केली. दरम्यान, राज्यपाल नियुक्त तीन आमदार आणि राज्यसभेच्या एका जागेबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.  

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत होणार आहेत. सर्व ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे आणि सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. 

या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. 

निवडणूक तारखा : 
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल  
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 
केरळ : एकाच टप्प्यात 6  एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल  
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल  
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल 
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com