गुड न्यूज : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील चूकही आता दुरुस्त करता येणार - now you can correct mistakes on covid vaccination certificate | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील चूकही आता दुरुस्त करता येणार

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जून 2021

परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. याचबरोबर परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही हे प्रमाणपत्र आवश्यक असेल. 

नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणावर (CovidVaccination) भर दिला आहे. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र (Certificate) बंधनकारक आहे. याचबरोबर परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही हे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. यामुळे यात चूक झालेली असल्यास ती आता दुरुस्त करता येणार आहे. कोविन पोर्टवरच (C0-win) ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर नागरिकांना लस प्रमाणपत्र मिळते. यात चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करता येईल. त्यासाठी केंद्र सरकारने कोविन पोर्टलवर सुविधा दिली आहे. यात चुकलेले नाव, चुकलेली तारीख यामध्ये सुधारणा करता येणार आहे. कोविन पोर्टलवर लस घेतलेल्या व्यक्तीला ही दुरुस्ती करता येणार आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्र परदेश प्रवासासाठी आवश्यक ठरणार आहे. त्यादृष्टीने ही नवीन सुविधा महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने लसीकरण झालेल्या नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपवरही त्यांची माहिती अद्ययावत करण्याची परवानगी दिली होती. 

हेही वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींचे संकेत 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख