डीजीपी संजय पांडेंचा करिष्मा..चारच महिन्यांत पोचले कर्मचाऱ्यांच्या देवघरात!

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी अवघ्या साडेचार महिन्यात आपल्या वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटवलाआहे.
now dgp sanjay pande photos in police personnel houses
now dgp sanjay pande photos in police personnel houses

पिंपरी :  पोलिस कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न न सांगता राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात यशस्वी झालेले राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी अवघ्या साडेचार महिन्यात आपल्या वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या करिष्म्यामुळे पोलिस कर्मचारी त्यांना देवमाणूस मानू लागले आहेत. काहींनी,तर त्यांचा फोटो देवघरात ठेवला आहे.

लोकलमधून प्रवास करणारे पांडे हे राज्याचे पहिले डीजी दर्जाचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. होमगार्ड डीजी असताना ३१ मार्चपर्यंत ते मुंबईत घर ते कार्यालय व कार्यालय ते घर (पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते चर्चगेट) असा लोकलने प्रवास करीत होते. असा प्रवास करणारे ३३ वर्षे सेवा झालेले डीजी दर्जाचे ते राज्यातील नाही, तर देशातील पहिले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. केलेल्या कामाचा अहवाल दर आठवड्याला फेसबुकवरून देणारे व पुढील आठवड्यात काम काम करणार आहे, तेही सांगणारे ते पहिलेच डीजीपी आहेत. त्यांचा हा पायंडा नंतरच्या डीजीपींसाठीही आदर्शवत ठरणार आहे. आयपीएसचा इगो नसलेले अत्यंत प्रामाणिक प्रतिमेचे नम्र अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.

१९८६ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी पांडे यांनी १ एप्रिलला राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून कारभार हाती घेतला अन पोलिस कर्मचाऱ्यांचे गेल्या कित्येक वर्षाचे अनेक प्रलंबित प्रश्न प्रथमच एवढ्या त्वरेने मार्गी लागण्यास सुरवात झाली. पोलिसांच्या त्यांच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. त्यांना बढती मिळाली. पोलिस शिपाई म्हणून भरती झालेला आतापर्यंत हवालदार वा जमादार म्हणूनच निवृत्त होत होता. आता तो फौजदार म्हणजे अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होईल, असा निर्णय त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. भत्त्यासारखे इतर विषयही सुटण्याच्या मार्गावर आहेत. 

अशाच समस्या पोलिस खात्यात कनिष्ठ पातळीवर अधिक सतावतात. त्यांनाच पांडे यांनी डीजीपी होताच हात घातला व त्या सोडवल्या. आतापर्यंत त्यासाठी पत्रव्यवहार, अनेक हेलपाटे मारुनही त्या  सुटत नव्हत्या. फक्त वशिला असलेले व पैसे देण्याची ऐपत असलेल्यांचीच चलती होती. एसआरपीसारख्या साइड ब्रँचला असलेल्यांच्याही समस्या हेरून त्या ते मार्गी लावीत आहेत. आतापर्यंतच्या कुठल्याही डीजीपींनी सर्वात कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांत एवढ्या गांभीर्याने व बारकाईने लक्ष घालून ते सोडविले नसल्याने त्यांच्याविषयी देवमाणसासारखी प्रतिमा या कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. खाकीतील देवमाणूस म्हणून पोलिस कर्मचारीच नाही,तर त्यांची चिमुकली मुलेही त्यांना देवासारखे पूजत आहेत.

सोशल मीडियाचा योग्य व परिणामकारक वापर ते करून घेत आहेत. त्यामार्फत ते आपल्या दलाशी वरचेवर संवाद साधून त्यांचे प्रश्न  जाणून घेतात. हंगामी असूनही कायम डीजीपींपेक्षा त्यांनी उजवा कारभार केला. नुकताच मोहरमचा बंदोबस्त व्यवस्थित पार पडल्याने त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांचे सोशल मीडियातूनच कौतुक करीत त्यांना शाबासकीही दिली. त्यांच्या या कार्यपद्धतीतून माजी डीजीपी अरविंद इनामदार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

सरकारी पातळीवर बदल्यांसाठी तारीख वारंवार वाढविण्यात आली होती. त्यामुळे पांडे नाराज झाल्याची चर्चा होती. पांडे यांनी पोलिस निरीक्षक दर्जापर्यंतच्या बदल्यांसाठी फार प्रतीक्षा न करता त्या उरकून घेतल्या. प्रत्येकाकडे तीन पर्याय बदलीलाठी मागविण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांना संधी मिळेल, असे प्रयत्न त्यांनी केले. 99 टक्क्यांहून अधिक या पीएसआय ते पीआय या दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोईने ठिकाण मिळाले. डीवायएसपी आणि वरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीही त्यांनी तीच पद्धत अवलंबली आहे. ज्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसेल त्यांना जिल्ह्यात नेमण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com