गुड न्यूज : ब्लॅक फंगसवरील उपचार होणार आता शंभर पट स्वस्त

ब्लॅक फंगस हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराच्या उपचारावरील खर्च शंभरपट स्वस्त होणार आहे.
गुड न्यूज : ब्लॅक फंगसवरील उपचार होणार आता शंभर पट स्वस्त
now black fungus treatment will get hundred time cheaper

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराच्या उपचारावरील (treatment) खर्च खूप मोठा असून, तो आता शंभरपट स्वस्त होणार आहे. यासाठी डॉक्टरांनी नवीन उपचारपद्धती शोधली आहे.  

देशात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यातील सर्वांत मोठी अडचण ही अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनच्या टंचाईची आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन दिली जात आहेत. परंतु, ही इंजेक्शन अपुरी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एका रुग्णाला बरे होण्यासाठी सुमारे 50 ते 100 इंजेक्शन लागतात. एका इंजेक्शनची किंमत 6 ते 8 हजार आहे. म्हणजेच हा खर्च काही लाखांच्या घरात जातो. 

डॉक्टरांनी आता या औषधाला पर्याय शोधला आहे. लिपोसोमल या प्रकारातील अॅम्फोटेरिसीन इंजेक्शनच्या जागी पारंपरिक प्रकारातील अॅम्फोटेरिसीन औषध रुग्णांना देता येऊ शकते. यामुळे औषधांचा खर्च केवळ 350 ते 35 हजार रुपयांच्या घरात येत आहे. परंतु, हे औषध देताना डॉक्टरांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या औषधांचा परिणाम थेट किडनीवर होतो. त्यामुळे ते देताना एक दिवसाआड रुग्णाची रक्तचाचणी करणे आवश्यक असते. यातून रुग्णाची क्रिअॅटनीन पातळी तपासली जाते. 

रुग्णाला 21 दिवसांच्या उपचाराच्या कालावधीत दोन ते तीन दिवस विश्रांती घेऊन हे औषध देता येते. क्रिअॅटनीन हे शरीरात तयार होणारा टाकाऊ घटक किडनीवाटे शरीरातून बाहेर टाकला जातो. लिपोसोमल आणि पारंपरिक या दोन्ही अॅम्फोटेरिसीनची परिणामकारकता समान आहे. परंतु, मधुमेहासह इतर विकार असलेल्या रुग्णांना पारंपरिक औषध देता येत नाही. परंतु, इतर रुग्णांना योग्य काळजी घेऊन ते देता येते आणि त्यामुळे उपचारावरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोनातून बरे झालेले रुग्ण आधीच उपचारासाठी खर्च केल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात. यातच म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबीयांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एक तर इंजेक्शन मिळत नाही आणि मिळाले तरी परवडत नाही, अशी अवस्था अनेकांची होत आहे. रुग्णावर उपचारासाठी इंजेक्शनसाठीच सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च होत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. 

देशातील अनेक राज्यांनी याला साथीचा रोग जाहीर केला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात यावरील उपचार मोफत होतात. परंतु, खासगी रुग्णालयात यावर उपचारासाठी मोठा खर्च हत आहे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे बिल 10 ते 15 लाख रुपये होत आहे. परंतु, हे सगळ्यांनाच परवडण्यासारखे नाही. महागडे उपचार परवडू शकत नाहीत अशा रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या रुग्णाचा हा जीवघेणा आजार बळी घेत असताना त्याच्या कुटुंबीयांसमोर असहायपणे पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in