कोमात गेलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम पुन्हा जोमात..! - north korean leader kim jong un appears again amid rumors of ill health | Politics Marathi News - Sarkarnama

कोमात गेलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम पुन्हा जोमात..!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे कोमात गेल्याची चर्चा सुरू होती. यावर किम यांनी पक्षाची बैठक घेऊन सर्व चर्चेवर अखेर पडदा टाकला आहे. 

प्योगाँग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे कोमात गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अखेर किम यांनी पक्षाची बैठक घेऊन या चर्चेला विराम दिला आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने किम यांची पक्षाच्या बैठकीतील काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. यामुळे किम यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर पडदा पडला आहे. किम यांनी पक्षाच्या बैठकीत कोरोना संकट आणि देशावर घोंघावणारे बावी चक्रीवादळ याचा मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यास या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या या देशाची अवस्था आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यातच पुढील आठवड्यात बावी चक्रीवादळ देशाला धडकत आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. किम जोंग उन यांनी पक्षाच्या पॉलिट  ब्युरोची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत किम हे सिगारेट पित होते. बैठकीत त्यांनी कोरोना विषाणू देशापासून दूर ठेवण्यात काही अडचणी येत असून, यात सरकारी प्रयत्न काहीसे कमी पडत आहेत, अशी कबुलीही दिली. 

किम जोंग उन यांनी लहान बहीण किम यो जोंग हिला अघोषित उपाध्यक्ष बनविल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील गुप्तचर संस्थेने दिले आहे. त्यांच्याकडे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याबरोबरील संबंधांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले होते. किम यांच्यावरील ताण कमी व्हावा आणि अपयश आल्यास दोष पत्करावा लागू नये, असे हेतू यामागे आहेत, असेही म्हटले होते. यामुळे किम जोंग यांच्या प्रकृतीबाब मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. त्या कोमात गेल्याची चर्चाही सुरू झाली होती.  

दक्षिण कोरियाच्या सीमेजवळील काएसाँग गावात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण मिळताच किम जोंग उन यांनी आणीबाणी लागू करून ते गावच लॉकडाऊन केले होते. ही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आल्याचे नंतर जाहीर करण्यात आले आहे. देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. मात्र, जागतिक पातळीवर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.  

किम यांना त्यावेळी बोलताना कोरोनाचा देशात शिरकाव झाला असे वाटते, पण यास दक्षिण कोरियातून परतलेला घुसखोर जबाबदार असल्याचा दावा केला होता. गरिबी आणि राजकीय दडपशाहीला कंटाळून अनेक नागरिक दक्षिण कोरियात पळून जात आहेत. त्यांना रोखण्याच्या उद्देशाने किम यांनी हा बनाव रचल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी नोंदवले  होते.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख