जगातील कोणतीही शक्ती पीडितेच्या कुटुंबाचा आवाज दाबू शकत नाही; राहुल गांधींचा हाथरसमधून हल्लाबोल - No power in the world can suppress the victims family voice says Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

जगातील कोणतीही शक्ती पीडितेच्या कुटुंबाचा आवाज दाबू शकत नाही; राहुल गांधींचा हाथरसमधून हल्लाबोल

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

हाथरसमधील बलात्कार  प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अखेर सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. 

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काल हाथरसला जाण्यापासून रोखण्यात आले होते. आज त्यांना अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने दिल्ली-नोएडा फ्लायवेवरुन हाथरसकडे जाण्याची परवानगी दिली होती. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज रात्री हाथरसला पोचले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जगातील कोणतीही शक्ती पीडितेच्या कुटुंबीयांचा आवाज दाबू शकत नाही, असे राहुल यांनी या वेळी भाजप सरकारला ठणकावले. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली होती. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अडवून पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले होते.

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. 

राहुल गांधी यांनी आज पुन्हा हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्धार केला होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघे एकाच मोटारीतून हाथरसला गेले. ही मोटार प्रियंका गांधीच चालवत होत्या. त्यावेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी आज आम्हाला अडवले तर पुन्हा आम्ही जाण्याचा प्रयत्न करु, असा निर्धार व्यक्त केला होता. 

यामुळे दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी काँग्रेसचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले होते. राहुल आणि प्रियंका यांचे येथे आगमन होताच कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. राहुल गांधी यांनी काही काळ कार्यकर्त्यांशी संवादही साधला होता. अखेर योगी सरकारने राहुल आणि प्रियंका यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. पीडितेच्या कुटुंबीयांना केवळ पाच व्यक्तींनाच भेटण्याची अट सरकारने घातली. यानंतर राहुल आणि प्रियंका हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल आणि प्रियंका यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 

यानंतर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, कुटुंबीयांना मुलीचे शेवटचे दर्शनही घेऊ दिले नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणी जबाबदारी स्वीकारावी. जोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयीन चौकशी आणि जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख