बिहारच्या निवडणुकीनंतर नितीश भाजपची साथ सोडून मोदींना देणार आव्हान - Nitish Kumar will quit NDA after assembly polls says Chirag Paswan | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या निवडणुकीनंतर नितीश भाजपची साथ सोडून मोदींना देणार आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात प्रचाराला जोर चढला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 

नवी दिल्ली : बिहारची विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपची साथ सोडतील, असा दावा लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज केला. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आव्हान देतील, असे भाकितही पासवान यांनी केले आहे. 

एनडीएमधून एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

आता चिराग यांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, नितीशकुमार यांनी वारंवार पलटी मारली आहे. यामुळे त्यांचे नाव पलटूराम पडले आहे. आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी दीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर नितीश सत्तेत आले. काही वर्षांनी त्यांनी भाजपची साथ सोडून कट्टर शत्रू असलेल्या आरजेडीशी हातमिळवणी केली. काही काळाने त्यांनी आरजेडीची साथ सोडून पुन्हा भाजपचा हात पकडला. 

नितीशकुमार हे राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला मोदींचे प्रतिस्पर्धी मानत आहेत. लालूप्रसाद यांच्यासोबत त्यांनी मोदींवर विखारी भाषेत टीका केली होती. पाच वर्षांपूर्वी ते मोदींना शिव्या देत होते आणि नंतर दोनच वर्षांत त्यांनी लालूंना बाजूला फेकून एनडीएत पुनरागमन केले. माझे शब्द लिहून ठेवा की ते निवडणुकीनंतर महाआघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. याचबरोबर ते 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मोदींना पर्याय म्हणून उभे राहतील, असा दावा चिराग पासवान यांनी केला. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख