भाजप अडचणीत...नितीशकुमार, चिराग अन् तेजस्वी आले एकत्र!

बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप अडचणीत...नितीशकुमार, चिराग अन् तेजस्वी आले एकत्र!
nitish kumar tejashwi yadav and chirag paswan support caste based census

पाटणा : बिहारच्या (Bihar) राजकारणात मागील काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांची लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याशी जवळीक वाढली आहे.यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.  

पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांचे जवळ येऊ लागले आहेत. 

चिराग पासवान यांनी जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे. या दोघांना एकत्र आणण्यामागे जातीवर आधारित जनगणना हे कारण आहे. जनगणनेशिवाय समाजात असलेल्या वेगवेगळ्या जातींची सद्य:स्थिती समजणार नाही, असा पासवान यांचा दावा आहे. या प्रकारच्या जनगणनेच्या आकडेवारीतून सरकारला पिछाडीवर असलेल्या जातींच्या विकासाबाबत योजना तयार करणे शक्य होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे चिराग पासवान आता भाजपपासून दुरावले आहेत. पासवान यांच्या लोक जनशक्ती  पक्षात फूट पडली आहे. त्यांचे काका खासदार पशुपतिकुमार पारस यांनी पक्षात फूट पाडली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने नितीशकुमार यांच्याविरोधात चिराग पासवान यांचा वापर करुन घेतला होता.  

जातीवर आधारित जनगणनेच्या मुद्यावरून नितीशकुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हेसुद्धा एकत्र आले आहेत. तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. केंद्र सरकारने जातीवर आधारित जनगणना केली नाही तर केरळप्रमाणे बिहार सरकारही काम करू शकतो. हे कोणत्याही राज्याला शक्य आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटले होते. या मताला दुजोरा देत नितीशकुमार यांनीही केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केली नाही तर बिहारसाठी हा पर्याय खुला राहील, असे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून भाजपने मात्र विरोधात आघाडी उघडली आहे. जातीवर आधारित जनगणनेची गरज नसल्याचे भाजप नेते म्हणत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in