मोठी बातमी : गडकरी, जावडेकर, गोयल अन् इराणींचा भार होणार हलका - nitin gadkari and prakash javdekar will shed ministries in cabinet exapnsion | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मोठी बातमी : गडकरी, जावडेकर, गोयल अन् इराणींचा भार होणार हलका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. यात अनेक मंत्र्यांचा भार हलका होणार आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करणार आहेत. यात पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. याचवेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari), प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांच्यासह अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक मंत्रालयाचा कार्यभार आहे. त्यांचा भार हलका केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. सध्या नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, हर्ष वर्धन, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी आणि हरदीपसिंह पुरी यांच्याकडे एकापेक्षा अधिक मंत्रालयाचा कार्यभार आहे. मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर सुमारे दोन वर्षे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे आताच्या विस्तारात या मंत्र्यांवरील भार हलका केला जाणार आहे. एकापेक्षा अधिक मंत्रालयाचा कार्यभार असलेल्या मंत्र्यांवर एकाच खात्याची जबाबदारी राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नियोजनपूर्वक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळावे, यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरवात झाली आहे. विद्यमान मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डसोबत नव्याने समावेश करावयाच्या सदस्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे मूल्यमापनही करण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका महत्वाच्या असल्याने त्यांचा विचार करुनही नवीन चेहऱ्यांची निवड केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार; 28 जणांचा होणार समावेश 

कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक मंत्र्याने केलेल्या कामाचेही मूल्यमापन करण्यात आलेले आहे. सुमारे महिनाभराच्या चर्चेनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशला सर्वाधिक स्थान मिळण्याची चिन्हे आहेत. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी तेथील नेत्यांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख