सचिन वाझे प्रकरणात माफीचा साक्षीदार कोण? 'एनआयए'ने केला मोठा खुलासा - nia sources says colleague of sachin vaze has not been made approver | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझे प्रकरणात माफीचा साक्षीदार कोण? 'एनआयए'ने केला मोठा खुलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मार्च 2021

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आता या प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराची चर्चा सुरू झाली आहे.  

मुंबई :  निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज विशेष न्यायालयात केली. न्यायालयाने वाझेंची 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराची चर्चा सुरू झाली असून, याबाबत एनआयएने अखेर खुलासा केला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपी सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीची मुदत 15 दिवस वाढवावी, अशी मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने वाझेंची 3 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी केली आहे. 

या प्रकरणात वाझेंचा गुन्हे गुप्तवार्ता विभागातील (सीआययू) सहकाऱ्याला एनआयएने माफीचा साक्षीदार बनवल्याची चर्चा आहे. यावर एनआयएच्या सूत्रांनी म्हटले आहे की, अँटिलिया स्फोटक प्रकरणात सीआययूमधील वाझेंच्या एका सहकाऱ्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आल्याचे वृत्त खोटे आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर माफीचा साक्षीदार बनवण्याचा निर्णय घेण्यात येईल.  

हेही वाचा : वाझेंच्या घरात सापडल्या पिस्तुलाच्या 62 गोळ्या अन् त्यांचा सरकारी हिशेबच नाही

सचिन वाझेंनी स्वत: अँटिलियाच्या बाहेर मोटारीत स्फोटके ठेवली होती. त्यांना या प्रकरणाचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करुन स्वत:ला सुपरकॉप म्हणून सिद्ध करायचे होते. वाझेंनीच ही माहिती एनआयएला दिली आहे. त्यांच्या या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जात आहे, अशी माहिती एनआयए सूत्रांनी दिली.  

हेही वाचा : मला बळीचा बकरा बनवलं जातंय...

नआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, वाझेंचा गुन्हा हा देशपातळीवरील एक मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास होणे हे महत्वाचे आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा अशा गुन्ह्यात सहभाग असणे ही शरमेची बाब आहे. 

न्यायालयात वाझेंचे वकील म्हणाले की, वाझेंबाबत  एनआयएकडे ठोस पुरावे नाहीत. कारण त्या गाडीत फक्त जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. डिटोनेटरशिवाय त्या कांड्या विस्फोटक मानल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत नोंदवलेली कलमे चुकीची आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख