मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त नगराळे राजभवनावर; राज्यपाल कोश्यारींशी केली चर्चा

परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
newly appointed mumbai police commissioner hemant nagrale meet governor
newly appointed mumbai police commissioner hemant nagrale meet governor

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुखांची पाठराखण केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना राजभवनावर बोलावून घेतल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना बोलावून घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. 

परमबीरसिंह यांच्याकड़ून मुंबईचे आयुक्तपद काढून घेऊन त्यांना कमी महत्वाच्या होम गार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचवेळी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असलेल्या नगराळेंची राज्य सरकारने मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर परमरबीरसिंह यांनी गृहमंत्र्यावर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना नगराळे आणि राज्यपालांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांची फेब्रुवारी महिन्यात भेट झाल्याचा परमबीरसिंह यांनी केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढला आहे. देशमुख हे ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रुग्णालयात होते, तर १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ते क्वारंटाईन होते, असे पवार यांनी सांगितले. पवारांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे.

पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर देशमुख यांनी १५ तारखेला पत्रकार परिषद घेतल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ देशमुख यांच्या ट्विटर अकाऊंटवरील आहे. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पजत्र परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीस यांनी त्यानंतर आणखी एक ट्विट केले असून परमबीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात नमूद केलेला एसएमएसचा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com