सावधान : कोरोनाचा नवीन विषाणू आरटीपीसीआर चाचणीत सापडेना अन् लक्षणेही वेगळी - New mutant of coronavirus seems to be undetectable by RTPCR test | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

सावधान : कोरोनाचा नवीन विषाणू आरटीपीसीआर चाचणीत सापडेना अन् लक्षणेही वेगळी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत देशात  3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आता नवीन म्युटंट स्ट्रेनचा धोका निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत देशात  3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. यातच आता नवीन म्युटंट स्ट्रेनचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार आरटीपीसीआर चाचणीतही सापडत नाही. तसेच, याचा संसर्ग झाल्यानंतरची लक्षणेही वेगळी आहेत. यामुळे आता कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

याविषयी बोलताना युरोपियन युनियनचे भारतातील प्रधान वैद्यकीय सल्लागार डॉ. सौरदीप्त चंद्रा यांनी म्हणाले की, कोरोना विषाणूचा नवा प्रकार आरटीपीसीआर चाचणीतही सापडत नाही. दोन आणि तीन वेळा म्युटेशन झालेले कोरोना विषाणू सापडले आहेत. या विषाणूच्या रचनेत बदल झाल्यामुळे तो आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये सापडत नाही. याचबरोबर या नव्या प्रकारच्या विषाणूची लक्षणेही वेगळी आहेत. 

नव्या प्रकारच्या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे  
- जुलाब 
- डोळे लाल होणे 
- पोटदुखी
- अंगावर चट्टे
- भ्रम 
- बोटे आणि पाय काळेनिळे पडणे 
-  नाक आणि घशातून रक्त येणे 

रुग्णसंख्या वाढीचा वेग चिंताजनक 
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 32 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग दोन दिवस नोंदवले आहेत. यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 62 लाख 63 हजार 695 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 86 हजार 657 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 32 हजार 730 रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 24 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 44 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 24 लाख 28 हजार 616 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.93 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 83.92 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 36 लाख 48 हजार 159 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.15 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख