सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीला पाचपट देणग्या अन् त्यात भाजपच्या मंगलप्रभात लोढांचेच पाच कोटी!

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तेत आल्यापासून देणग्यांचा ओघ वाढू लागला आहे. मागील आर्थिक वर्षात पक्षाला त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत पाचपट देणग्या मिळाल्या आहेत.
ncp received donation from bjp mla mangal prabhat lodha
ncp received donation from bjp mla mangal prabhat lodha

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादीकडे देणग्यांचा ओघ वाढू लागला आहे. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पक्षाला 59.94 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात देणग्यांमध्ये पाचपट वाढ झाली असून, यातील पाच कोटी रुपयांची मोठी देणगी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढांची आहे. याबाबतचे वृत्त 'द प्रिंट' संकेतस्थळाने दिले आहे.  

राजकीय पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्यास त्याची माहिती दरवर्षी निवडणूक आयोगाकडे जाहीर करणे बंधनकारक आहे. राष्ट्रवादीने मागील आर्थिक वर्षातील देणग्या निवडणूक आयोगाकडे सादर केल्या आहेत. याबाबतचे वृत्त 'द प्रिंट' या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तानुसार, मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पक्षाला 59.94 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्याआधीचे आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पक्षाला 12.05 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. यात मागील आर्थिक वर्षात पाचपट वाढ झाली आहे. 

मागील आर्थिक वर्षात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हलपर्स कंपनीने राष्ट्रवादीला 5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. लोढा हे पाच वेळा आमदार असून, ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत. 'द प्रिंट'ने याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी थेटपणे व्यवसाय पाहत नाही. तुम्ही यासाठी कंपनीतील इतर कोणाशी तरी संपर्क साधा. 

'द प्रिंट'ने नंतर कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. याबाबत 'द प्रिंट'शी बोलताना राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष व मंत्री नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणग्या स्वीकारल्या जात आहेत. याची सर्व माहिती पारदर्शकपणे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहे. यात विनाकारण संशय घेण्याची आवश्यकता नाही. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचे सरकार 1999 ते 2014 या काळात राज्यात सत्तेवर होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना आघाडीची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हे सरकार 2019 पर्यंत सत्तेत होते. राष्ट्रवादी सत्तेत नसताना लोढा डेव्हलपर्सने पक्षाला कोणतीही देणगी दिली नव्हती. याआधी शेवटची देणगी लोढा डेव्हलपर्सने राष्ट्रवादीला 2014-15 मध्ये 15 कोटी रुपयांची दिली होती. त्यावर्षी राष्ट्रवादीला 38.82 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. याचबरोबर लोढा ग्रुपची उपकंपनी पलावा ड्वेलर्सने राष्ट्रवादीला 2014-15 मध्ये 3 कोटी रुपये दिले होते. राष्ट्रवादी सत्तेत नसताना पक्षाच्या देणग्या कमी झाल्या होत्या. आता पक्ष सत्तेत आल्यानंतर देणग्या पुन्हा वाढू लागल्या आहेत, असे 'द प्रिंट'च्या वृत्तात म्हटले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com