राज्यपालांकडे कंगनासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांना भेटायला नाही; शरद पवारांचा टोला

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील लाखो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.
ncp president sharad pawar slams governor bhagat singh koshyari
ncp president sharad pawar slams governor bhagat singh koshyari

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे दोन महिन्यांपासून अधिक काळ सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील शेतकरी मुंबईत एकवटले आहेत. शेतकरी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटून निवेदन देणार होते. मात्र, कोश्यारी हे गोव्याला गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. 

राज्यभरातील लाखो शेतकरी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवार म्हणाले की. राज्याभरातील शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्यात जाऊन बसले आहेत. मागील वर्षी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या घराचा काही भाग पाडल्यानंतर तिला भेटायला त्यांच्याकडे वेळ होता. परंतु, शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. 

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पाहिले नव्हते. लाखो लोक इथे आले आहेत आणि ते गोव्याला गेले आहेत. शेतकरी हे राज्यपालांना निवेदन देणार होते. शेतकऱ्यांची भेट घेणे हे राज्यपालांचे नैतिक कर्तव्य होते. मात्र, त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नाही, असेही पवार म्हणाले.  

घटनेकडे दुर्लक्ष करुन तुम्ही कायदे संमत करु शकता मात्र, यातून तुम्ही संसदेची प्रतिष्ठा आणि संसदीय व्यवस्था नष्ट करीत आहात. ज्यावेळी देशातील सामान्य माणून आणि शेतकरी जागा होईल त्यावेळी तो तुम्हाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही कायदे मागे घ्या अथवा नाही. कोणत्याही चर्चेशिवाय कृषि विधेयके संमत करण्यात आली. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे, असा हल्लाबोलही पवारांनी केला. 
या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ऑल इंडिया किसान सभेचे सरचिटणीस हनन मुल्ला आणि इतरांना कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. 

कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला या सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांतील शेतकरी सहभागी आहेत. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com