कोण कुणाचा बाप...शशिकांत शिंदे अन् चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली - ncp mla shashikant shinde slams bjp leader chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोण कुणाचा बाप...शशिकांत शिंदे अन् चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेवर टीका करताना बाप काढला होता. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार जुंपली आहे. 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार जुंपली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना आम्ही राष्ट्रवादीचे बाप आहोत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. यावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

पुण्यातल्या सत्तेची स्वप्ने पाहात पुण्यात ऊर्जा वाया घालवू नका. आम्ही तुमचे बाप आहोत, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी आव्हान दिले होते. पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता सोशल मीडियावर जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकात पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. याला चंद्रकांत पाटीलही उत्तर देत आहेत. 

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता.

देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कामगार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपची? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमची आई आणि बाप हे दोन्हीही जनताच आहे. दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे. तुम्ही सुद्धा पाहिलंय. 

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनीही चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून येत्या महापालिका निवडणुकीत काय होणार याची आयडिया चंद्रकांत पाटील यांना आली आहे. त्यामुळे ते घाबरले असून घाबल्यानंतर जे होतं ते चंद्रकांत पाटील यांचं होत आहे. त्यांना स्वप्नातही अजित पवार दिसू लागलेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख