राष्ट्रवादीचा आमदार डाव्यांची साथ सोडून काँग्रेसचा धरणार हात..! - ncp mla in kerala mani c kappan will join hands with congress | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचा आमदार डाव्यांची साथ सोडून काँग्रेसचा धरणार हात..!

वृत्तसंस्था
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने आता सत्ताधारी डाव्या आघाडी सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  

तिरुअनंतपुरम : केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मणी सी. कप्पन हे सध्या राज्य सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी राज्यातील डाव्या आघाडी सरकारची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. आमच्या पक्षाला डावे सन्मानाची वागणूक देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयाला पक्ष नेतृत्वाचाही पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

कप्पन हे सध्या कोट्टायम जिल्ह्यातील पाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 
एप्रिल महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) पाला मतदारसंघ सोडण्यास नकार दिलेला आहे. यामुळे ते नाराज आहेत. यातून त्यांनी काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये (यू़डीएफ) जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

याबाबत बोलताना आमदार कप्पन म्हणाले की, एलडीएफने आम्हाला चार जागा देण्याचे कबूल केल्याने आम्ही आघाडी कायम ठेवली. मात्र, मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आम्हाला पाला मतदारसंघाऐवजी कुट्टनाड मतदारसंघ देण्यात येईल, असे म्हटले आहे. आता याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल. 

हा मुद्दा केवळ एका जागेचा नाही तर विश्वासाचा आहे. पाला मतदारसंघातील यशानंतर एलडीएफची विजयी घोडदौड सुरू झाली. माझ्या मनात मुख्यमंत्री विजयन यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यांनी येथील विकास प्रकल्पांना गती दिली आहे, असेही कप्पन यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कप्पन यांनी नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी या मुदद्यावर चर्चा करण्यास सांगितले होते. परंतु विजयन यांनी पाला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

एलडीएफने कुट्टनाड मतदारसंघ सोडण्याची तयारी केली असून, या मतदारसंघाचे आमदार थॉमस चंडी यांचे निधन झाले आहे. दरम्यान, पाला मतदारसंघावर यूडीएफचे वर्चस्व राहिले आहे. या ठिकाणी माजी अर्थमंत्री के.एम.मणी हे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर मणी सी. कप्पन हे यूडीएफच्या उमेदवाराचा पराभव करत निवडून आले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख