राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्यांच्या पी.ए.नी उलगडली डायरीची "ती" पाने.. - NCP leader's PA Facebook post goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्यांच्या पी.ए.नी उलगडली डायरीची "ती" पाने..

मिलिंद संगई
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी फेसबुकवर अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्यावर एक पोस्ट लिहिल्यानंतर चर्चा सुरु झाली. 

बारामती : राजकारणात अनेक किस्से चघळले जातात, मध्यंतरी नितीन गडकरी यांनी असेच एका भाषणात चहापेक्षा किटली गरम...असे वर्णन ज्या पी.ए.चे (स्वीय सहायक) केले, त्याच पी.ए. बाबत अनेक चांगले कंगोरेही असतात.. दुर्देवाने ते कधी समोर येत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी फेसबुकवर नुकतीच अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्यावर एक पोस्ट लिहिल्यानंतर याची चर्चा सुरु झाली. 

वास्तविक राजकीय नेतृत्वांच्या स्वीय सहायकांबाबत ज्येष्ठ नेत्यांच्या स्वीय सहायकांनी अशी जाहीर कौतुकाची पावती देण्याचा प्रसंग तसा विरळाच. सतीश राऊत हे कवी मनाचे. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेले राऊत हे पवार यांच्यासमवेतच गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. नोकरीतील बढती व इतर आकर्षणाच्या बाबी दूर सारत त्यांनी पवार यांच्यासमवेत कामाला आयुष्यात महत्व दिले. आज अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून राज्यात कोठेही नियुक्ती मिळाली असती, पण पवार यांच्या समवेतच आपल्याला काम करायचे हे जीवनाचे ध्येय त्यांनी निश्चित केलेले.

राऊत यांच्या फेसबुकवरील पोस्ट कमालीच्या लोकप्रिय झाल्या. अनेक किस्से त्यांनी जिवंत केले व लोकांनाही त्या किश्श्यातून अनेक बाबी उलगडल्या. याच राऊत यांनी अजितदादांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्या कौतुकाची पोस्ट शेअर केली. ते म्हणतात.....अजितदादा हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले नाव ! दादांच्या आवाजातली जरब आणि वागण्यातला दरारा भल्या -भल्यांची भंबेरी उडवतो. वक्तशीरपणा, करडी शिस्त आणि स्वच्छता- टापटीपणा हे त्यांच्यातील गुण जनमाणसांवर प्रभाव पाडतात आणि प्रशासनावर मजबूत पकड ठेवतात. ‘द मॅन व्हू परफॅार्मस & डिलीव्हर्स’ अशी त्यांची ख्याती आहे. बरं हे सगळं प्रत्यक्षात पार पडण्यासाठी त्यांच्या खासगी स्टाफची पण मोठी कसरत होत असावी असे मला कायम वाटते. 

‘सदा सज्जता’ हे ब्रीद मनात बाळगूनच त्यांना काम करावे लागत असावे. दादा आमच्या साहेबांकडे आले की मी त्यांच्या पी.ए. मंडळींकडे नेहमी उत्सुकतेने पाहत असतो. कायम सावधान अवस्थेत असणारे त्यांचे पी.ए. आपले अवधान लगेच खेचतात. त्यांचे डोळे आणि कान सतत दादांकडे लागून असतात. लढाईच्या मैदानात उतरायचं म्हटलं तर तलवार विसरून कसे चालेल ? दादांचे सैनिक मात्र सगळ्या शस्त्रांनिशी तयार असतात आणि ते ही अगदी जवळ ! मी नेहमी विनोदाने म्हणतो की दादांचे पी.ए. हाताच्या अंतरावर असतात तर आम्ही मात्र हाकेच्या अंतरावर असले तरी चालते ! 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट मध्ये सुनील कुमार मुसळेंची गाठ पडली. दादांचा पी.ए. असल्याच्या सिग्नेचर स्टाईल मध्ये ते होते ! शर्टाच्या खिशात नुसता पेन अडकवलेला नव्हता तर त्याच्या सोबतीला पेनासारख्या दिसणाऱ्या पेन्सील आणि पिवळ्या रंगाचा हायलाईटर ह्या सवंगडयांनी गर्दी केली होती. मी ‘खोड रबर कुठे आहे ?’ विचारलं तर मुसळे पेन्सील बाहेर काढून टोपणाच्या वरच्या भागात डोकावणारा रबर दाखवत ‘हा काय ?’ असे लगेचच उद्गारले ! मला त्यांची डायरी पाहण्यात मोह आवरेना ! मागणी करताच ती त्यांनी पुढ्यात ठेवली. 

डायरीचे मुखपृष्ठ उघडले की, त्याच्या मागील बाजूवर पांढऱ्या रंगांचे पाकीट चिकटवून कागदाच्या स्लिप ठेवण्यासाठी रकाना केल्याचे दिसले. वाटेत कधीही निरोप द्यायची वेळ आली की ते पाकीटातून स्लिप काढून तात्काळ निरोप लिहून देतात. इतर पी.ए. ना डायरीची मागील पाने फाडून चिठ्ठ्या बनवण्याची धडपड करताना मी बऱ्याचदा पाहिले आहे, तर काहींना दुसऱ्यांकडे कोरा कागद मागताना पाहिले आहे. दादांच्या पी.ए.वर ही कागद याचना करण्याची कधीही वेळ येत नाही . 

मी पुढची पाने उलटली नाहीत ! कारण त्यात डोकावण्याचा मला अधिकार नव्हता. मुसळेंनी माझी उत्सुकता ओळखली ! त्यांनी डायरीची शेवटची पाने उघडली. त्यात बुडापर्यंत कापलेल्या दसकटासमान कागदी कपटीवर पाच -पंचवीस टाचण्या खोचून ठेवलेल्या दिसल्या ; सोबत गुंतलेल्या यू-पीनांनी माझे लक्ष वेधले. पण माझी नजर लहानशी सुई आणि दोरा शोधत होती. 

काळाच्या ओघात सुई-दोरा, टॅग वगैरे लागत नसावेत ! नीट पाहिले नाही ! नाहीतर डायरीच्या पानात लपलेली पांढरी हाफ पट्टी हमखास दिसली असती. खिसा चाचपला असता तर तीन- चार रंगीत स्केचपेन, स्टेपलर, यलो स्लिपचे बंडल बाहेर काढता आले असते. मोबाईलमध्ये कालनिर्णय अॅप डाऊनलोड केलेले आढळले असते. मुसळे फोनची चालती -बोलती डिरेक्टरी आहे. डोनाल्ड ट्रम्पचा जरी मोबाईल मागितला तरी ते अर्ध्या तासात हुडकून देतील, असे दादांचे मुंबईतले अनिल ढिकले पी.ए. मजेने सांगतात ! असो ! गंमतीचा भाग सोडला तर अजितदादांची पी.ए.मंडळी किती सतर्क आणि ऑर्गनाईज्ड असतात याची आपणाला कल्पना आली असेल ! जगात प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतं ! मला देखील खूप काही शिकायला मिळतं अशा मंडळींकडून ! तुम्हालाही काही गोष्टी अनुकरणीय वाटतील. पी.ए. म्हटले की अशी माणसे मुर्तीमंतपणे माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि आपल्याही राहतील ! 

Edited  by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख