खडसेंच्या उपस्थितीत पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीत नाराजीनाटय! - ncp leaders not present at party meeting in presence of eknath khadse | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंच्या उपस्थितीत पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीत नाराजीनाटय!

कैलास शिंदे
बुधवार, 2 डिसेंबर 2020

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत पक्षाची पहिलीच बैठक आज झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाराजीचीच जास्त चर्चा झाली.  

जळगाव : भाजप सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज  ते प्रथमच पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले. या पहिल्याच बैठकीत नाराजीनाट्य रंगले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची बैठकीला अनुपस्थिती असल्याने पक्षात असलेल्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांचा बॅनरवर फोटो नसल्यावरुनही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.  

भाजप सोडून एकनाथ खडसे यांनी नुकताच मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नव्हती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जिल्हा कार्यालयात पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या  निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रसेचे माजी आमदार, खासदार तसेच जिल्हयातील पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार होते. तसेच, एकनाथ खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते या बैठकीस उपस्थित राहणार होते.

आज दुपारी पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीस कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार मनीष जैन तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, पक्षाचे नेते अरूण गुजराथी हे नातेवाईकांचे निधन झाल्याने गैरहजर होते. तर, पक्षाचे एकमेव विद्यमान आमदार अनिल पाटील हे सुध्दा काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गैरहजर होते. माजी खासदार वसंतराव मोरे उच्च न्यायालयात काम असल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे  सांगण्यात आले.

डॉ.पाटील यांच्या गैरहजेरीवर चर्चा
माजी आमदार डॉ.सतीश पाटील हे बैठकीला गैरहजर होते. ते का उपस्थित नाहीत याचा खुलासा मात्र जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी केला नाही. त्यामुळे ते का अनुपस्थित आहेत याची चर्चा सुरू होती. ते नाराज असल्यामुळे बैठकीला आले नसल्याचीही चर्चा होती.

कार्यकर्त्यांनी केली माफीची मागणी 
बैठक सुरू झाल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांचा वाढदिवसाच्या जाहिरातीत फोटो प्रसिध्द न केल्यामुळे माफी मागावी, अशी मागणी केली. पक्षात नुकत्याच प्रवेश केलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीत पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो होते परंतु, सतीश पाटील यांचा फोटो नव्हता. त्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत शरद पवार यांच्यासोबत जिल्हयातून ते पहिले आमदार  होते. मात्र, त्यांचाच फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बैठकीत उमटले सूर
माजी आमदार व मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या नाराजीबाबत बैठकीत उल्लेखही करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार या वेळी बोलताना म्हणाले की, जाहिरातीत फोटो हेतुपुरस्सर नव्हे तर अनवधानाने राहून गेला आहे. त्यामुळे डॉ. सतीश पाटील नाराज असतील तर मी त्यांच्या जाहीरपणे माफी मागतो. 

एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरील नेत्यांचा उल्लेख करताना म्हणाले की, फोटो चुकल्यामुळे नाराजी झाली आहे. त्यामुळे व्यासपीठावर बसलेल्यांनी आधी ज्या नेत्यांनी नावे घेतली आहेत, त्यानुसार त्या सर्वांचे नाव मी घेतल्याचे जाहीर करतो. कारण चुकीने कुणाचे नाव राहिले, तर नाराजी नको. 

खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आम्ही पक्षात नवीन आहोत, काही चुका होत असतील तर आम्हाला सांभाळून घ्या. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून आम्ही पक्षात आलो आहोत. पक्ष वाढविणे हेच आमचे ध्येय आहे. आपल्याला सर्वाना एकत्र राहून पक्ष वाढवायचा आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख