चौकशी देशमुखांची अन् जुंपली फडणवीस - आव्हाडांमध्ये! - ncp leader jitendra awhad and bjp leader devendra fadnavis target each other | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

चौकशी देशमुखांची अन् जुंपली फडणवीस - आव्हाडांमध्ये!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे.

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे. 

चांदीवाल चौकशी समिती आरोप झालेले गृहमंत्री, मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह या प्रकरणाशी निगडित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करेल. या चौकशीत मंत्री अथवा अधिकारी-कर्मचारी दोषी आढळल्यास ही समिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणांकडे हा तपास सोपवण्याची शिफारस करेल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच, गृह विभागाशी संबंधित शिफारशीही ही समिती करणार आहे. 

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करेल. 

देशमुखांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करुन याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जमीन व्यवहारासंबधी लावण्यात आलेली न्यायमूर्ती बी. एस. झोटींग  समिती आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपासंबधी लावण्यात आलेली के. यु. चांदीवाल समिती यांच्या परिपत्रकामध्ये एक शब्दाचेही अंतर नाही. झोटींग समितीला कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट अन्वये चौकशी करा, असे एखादे तरी त्यांच्या सरकारचे पत्र फडणवीस यांनी दाखवावे. 

यावर फडणवीस यांनी ट्विट करीत सरकारचे पत्रच दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे परममित्र जितेंद्र आव्हाडजी, मुख्य सचिवांचा अहवाल कुणी लिहिला, हे काही आपण उगाच सांगत नव्हतो. वाट पाहत होतोच आणि अपेक्षित परिणाम साधला गेला. असो, हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद! 

यामुळे देशमुखांच्या चौकशी समितीवरुन आव्हाड आणि फडणवीस यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

परमबीरसिंहांच्या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांकडून सरकारवर दबाव वाढला होता. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानुसार अखेर निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख