नारायण राणे ही तर गंजलेली तोफ; जयंत पाटलांचा टोला - ncp leader jayant patil targets bjp leader narayan rane | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणे ही तर गंजलेली तोफ; जयंत पाटलांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते नारायण राणे यांना टीका केली होती. याचा समाचार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला आहे. 

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे मातोश्रीच्या पिंजऱ्यातील वाघ अशी टीका भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. याचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी घेतला. गंजलेल्या तोफीतून निघणाऱ्या गोळ्यांचा आम्ही फारसा विचार करीत नसल्याचा टोला पाटील यांनी राणेंना लगावला. 

जयंत पाटील हे  अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, भाजपकडून सरकारच्या कारभाराबाबत गेली वर्षभर अपप्रचार सुरू आहे. दोन-तीन महिन्यांत आम्ही सत्तेत येऊ असे ते गेले वर्षभर सातत्याने सांगत आहे. विरोधकांचा अपप्रचार सुरू असला तरी महाविकास आघाडी सरकारने वर्ष पूर्ण केले. 

मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचनी पडलेले नाही. त्यामुळे प्रलोभने दाखवून व्याभिचार करीत सत्तेत येण्याचा या ना त्या मार्गाने भाजपचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्ष अडचणीत असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध वेगवगेळा अपप्रचार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सुरुवातीला कामकाजाचे जे तीन-चार महिने मिळाले त्यात या सरकारने धाडसी व जोखमीचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोना संकटकाळानंतर आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा हे सरकार ज्या विकासाचे स्वप्न घेवून काम करीत होते त्याला गती येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

एसएससीईटी मुदतवाढीला स्थगिती

कामगार संघटनांच्या मागणीनुसास एसएससीईटीला मुदतवाढ देण्याचा आदेश निवडणूक काळात काढण्याचा प्रयत्न झाला. या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारचे फाईल पुटअप करणाऱ्या झारीतील शुक्राचारांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते कुणाच्या सांगण्यावरून हे काम करताहेत हेही शोधले जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख