पवार कुटुंबात वाद नसून विरोधकांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही; जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांना फटकारल्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
ncp leader jayant patil clarifies about sharad pawar comment on parth pawar
ncp leader jayant patil clarifies about sharad pawar comment on parth pawar

मुंबई : पार्थ पवारांच्या मागणीला कवडीची किंमत नाही. ते अपरिपक्व आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पार्थ यांना फटकारले आहे. यावरुन मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षात आणि पवार कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर काही तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याचे समजते.  याबाबतचे वृत्त विविध वाहिन्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसापासून अजितदादांचे पुत्र पार्थ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत विधाने करीत आहेत. त्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे. पार्थ यांनी केलेल्या मागण्या आणि ट्विटची दखल खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीच घेतली आहे. 

याविषयी जयंत पाटील म्हणाले की, पक्षात आणि पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. सुशांतसिंह प्रकरणी पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. पार्थ पवार यांचे मत ते व्यक्तिगत असू शकेल. विरोधी पक्षांकडे टीका करण्यासाठी काही राहिलेले नसल्याने ते यावर बोलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेली बैठक ही पूर्वनियोजित होती. या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत काहीही चर्चा झालेली नाही. अजित पवार हे बैठक सोडून गेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेले. 

पवार साहेब आमच्या पक्षाचे आणि कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांना प्रत्येकाच्या बाबतीत सूचना आणि सल्ला देण्याचा पूर्ण अधिकार आहे.  पार्थ तर त्यांच्या घरातीलच आहे, यामुळे या सूचनावजा सल्ल्याला तो पाळेल. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. यामुळे बाहेरच्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही. घरात वाद आणि कोणतेही मतभेद नाहीत. विनाकारण विरोधकांनी याचा बाऊ करु नये, असेही पाटील म्हणाले. 

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पार्थ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे व्हावा, अशी मागणी करीत निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांनी पक्षाशी विसंगत अशाच भूमिका घेतल्या आहेत. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर पार्थ यांनी ट्विट करीत मंदिराला पाठिंबा दिला होता. तसेच हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले होते. 

पार्थ यांनी घेतलेल्या भूमिकेचा शरद पवार यांनी आज समाचार घेतला होता. पार्थ हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, असे त्यांनी म्हटले होते. सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्यच आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास असल्याचेही पवार यांनी म्हटले होते. 

पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर पार्थ यांनीही कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची बाजू घेतली आहे. पार्थ हे लंबी रेसका घोडा है, असे सांगत त्यांना थांबू नकोस मित्रा, असा सल्ला राणे यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com