जयंत पाटलांच्या बेरजेच्या राजकारणाला विश्वजीत कदम उणे करणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम हे आमनेसामने आले आहेत.
ncp leader jayant patil again tries to expand party in sangli
ncp leader jayant patil again tries to expand party in sangli

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळीच माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र,  कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी काँग्रेसमधील नगरसेवक व नेत्यांची समजूत काढल्याने एक गट राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापासून थांबला होता. 

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र असल्याने जयंत पाटील यांना काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याबाबत अडचणी आहेत. काँग्रेसच्या येथील बालेकिल्ल्याला कोणी धक्का लावू शकत नाही, असे विधान करून विश्वजीत कदम यांनी मध्यंतरी इशाराही दिला होता.

तरीही जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरुच आहेत. पण, मदन पाटील यांच्या पत्नी व काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्नही काँग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी विफल ठरवले होते. मात्र, दरम्यानच्या काळात जयंत पाटील यांनी मदनभाऊ गटाचे काही नगरसेवक गळाला लावले. त्यांना ताकद देण्याचे कामही ते करत आहेत. महापालिका क्षेत्रात मदन पाटील गटाची ताकद मोठी होती. मात्र, या गटाला सध्या तोलामोलाचा नेता नाही.

जयश्री पाटील या गटाचे नेतृत्व करत आहेत. पण, त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे हा गटही अस्वस्थ आहे. मदनभाऊ गटाने जयंत पाटील यांचे नेतृत्व सहजी स्वीकारलेले नाही. तसेच, विशाल पाटील यांचेही नेतृत्व त्यांनी स्वीकारलेले नाही. मदन पाटील यांच्या निधनानंतरही हा गट एकत्र राहिला. मात्र, आता बदलत्या राजकीय समीकरणात या गटाला नेतृत्वाची गरज भासत आहे. डॉ.विश्‍वजीत कदम यांनी नेतृत्व करावे, अशी या गटाची इच्छा आहे. त्यातूनच मदन पाटील गटाचे काही नगरसेवक सध्या डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली कामही करत आहेत. पण, डॉ. विश्‍वजीत कदमही अजून महापालिका क्षेत्रात पूर्ण लक्ष घालत नाहीत याचा फायदा घेण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज जयंत पाटील यांनी कृष्णा नदीवरील समाधीस्थळी जाऊन मदन पाटील यांना आदरांजली वाहिली. या निमित्ताने त्यांनी मदन पाटील गटाला पुन्हा एकदा भावनिकदृष्ट्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असली तरी काँग्रेसचे सदस्य जास्त आहेत. शिवाय येत्या फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत महापौर निवड असल्याने भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी सक्षम नेता काँग्रेसला हवा आहे. अर्थात तूर्तास तरी काँग्रेसमधील नगरसेवकांना पक्षांतर करण्यापासून थांबविण्यात नेते यशस्वी झाले आहेत पण राष्ट्रवादी पुढील डाव कोणता टाकेल याबाबत उत्सुकता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com